नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरस (coronavirus) वेगाने पसरत आहे. दर दिवशी याच्या संक्रमित लोकांच्या संख्येत वाढ होताना दिसतेय. लोकांमध्ये कोरोनाबाबत भीती निर्माण झाली असून लोक यापासून वाचण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. थोडासाही सर्दी-खोकला झाल्यास घाबरुन न जाता, डॉक्टरांचा सल्ला घेऊन सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात कोरोना व्हायरसचा पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर, डॉक्टरांनी काही सोपे उपाय सांगितले. डॉक्टरांनी वेळोवेळी हात धुण्याचा सल्ला दिलाय. सॅनिटायझर आणि हॅन्डवॉशचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे दुकानात सॅनिटायझर घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे. सॅनिटायझरच्या मागणीत वाढ होत असून दुकानांमध्ये याच्या साठ्यात कमतरता भासत आहे. त्यामुळे लोकांमध्ये आणखीच भीती वाढत आहे. 


गेल्या काही दिवसांपासून, काही दुकानांमध्ये सॅनिटायझर उपलब्ध होत नाहीये. सॅनिटायझरचा वापर न केल्यास कोरोनाचा धोका असल्याची समजूत अनेकांमध्ये आहे. 


लोकांमधील ही समस्या पाहता, इंडियन कॉउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या, संसर्गजन्य रोग विभागाच्या प्रमुखांना, केवळ सॅनिटायझरच्या वापराने कोरोनापासून बचाव होऊ शकतो का? सॅनिटायझर किंवा हॅन्डवॉश उपलब्ध नसल्यास काय करावे? असा प्रश्न विचारण्यात आला. 


इंडियन कॉउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅनिटायझरच्या ऐवजी साबणाचा वापर करता येऊ शकत असल्याचं ते म्हणाले. साबण बनवण्यासाठीदेखील त्याच केमिकलचा वापर केला जातो, जे सॅनिटायझरमध्ये असतात. 


ज्यावेळी आपण बाहेर असतो किंवा आपल्याकडे साबण नसतो, त्यावेळी सॅनिटायझरचा वापर करणं गरजेचं आहे. सॅनिटायझर न मिळाल्यास, किंवा अशा जागी जेथे साबण, हॅन्डवॉश नसेल त्यावेळी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. अशावेळी इतरांनी हात लावलेल्या जागी हात लावू नका. जर हात लावला असेल, तर हात पाण्याने स्वच्छ धुवेपर्यंत तोंडाजवळ, नाकाजवळ नेऊ नका. यामुळे संसर्गापासून वाचता येऊ शकतं.