मुंबई : आपण बऱ्याचदा बाहेरुन अन्न मागवतो आणि हे अन्न आपल्याला प्लॅस्टीकच्या भांड्यातून पाठवले जाते. आपण हे बाहेरील अन्न आवडीने खातो. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? की असं प्लॅस्टीकच्या भांड्यातील जेवण जेवणे शरीरासाठी आणि आरोग्यासाठी चांगलं आहे का? तसे पाहाता थंड गोष्टींसाठी प्लॅस्टीकच्या भांड्यात खाणे ठीक आहे, परंतु गरम गोष्टींसाठी, प्लास्टिकच्या ताटात किंवा भांडीमध्ये खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. याबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही महिन्यांपूर्वी केलेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे की, जेव्हा आपण गरम अन्नपदार्थ प्लास्टिकच्या भांड्यातील, प्लेटमध्ये, डिस्पोजेबल प्लेटमध्ये ठेवून खातो तेव्हा ते आपल्या आरोग्यास हानी पोहोचवते. यामुळे तुम्ही आजारी पडू शकता.


बिस्फेनॉल A (BPA) चा वापर प्लास्टिक बनवण्यासाठी केला जातो. बीपीए प्रत्यक्षात प्रामुख्याने पॉली कार्बोनेट किंवा पीसी (रीसायकल कोड 7) नावाच्या प्लास्टिकमध्ये आढळते. जर ते तुम्ही वापरत असलेल्या प्लॅस्टीकमध्ये जास्त असेल तर ते विषारी असू शकते. त्यामुळे हृदयविकार, स्तनाचा कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढू शकतो.


बीपीए हे मानवी शरीरातील इस्ट्रोजेनसारख्या हार्मोन्सचे असंतुलन करणारे रसायन असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या कारणामुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. हार्मोनल असंतुलनामुळे मूड स्विंग, चिंता-तणाव, चिडचिडेपणा, तसेच ऍलर्जी, हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि कर्करोगाचा धोका देखील वाढतो.


बीपीएने बनलेले प्लास्टिकचे कंटेनर गरम केल्याने अन्नातील बीपीएची पातळी वाढते. प्लॅस्टिकच्या भांड्यातील गोष्टी वारंवार खाल्ल्याने मुलांची प्रतिकारशक्तीही कमी होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.


तसेच असे ही सांगितले जाते की, गर्भवती महिलांनी प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये अन्न खात राहिल्यास बाळाच्या जन्मात विकृती निर्माण होऊ शकते.


मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये अन्न गरम करण्यास देखील मनाई आहे. असे म्हटले जाते की, जर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिकची भांडी किंवा बाटल्या ठेवल्या आणि त्यात गरम अन्न किंवा द्रव ठेवले तर बीपीए तुमच्या पदार्थामध्ये 50 पट वेगाने विरघळते. जर तुम्हाला मायक्रोवेव्ह वापरायचे असेल, तर प्लास्टिकऐवजी तुम्ही पेपर टॉवेल किंवा काचेची प्लेट किंवा सिरॅमिक वापरू शकता.