मुंबई : रोगप्रतिकारशक्ती म्हणजेच इम्युनिटी पॉवर अनेक आजारांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते. लगेच आजारी पडणं, सतत ताप, सर्दी-खोकला होणं ही रोगप्रतिकारशक्ती कमी असण्याची लक्षण असू शकतात. ज्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते ते लवकर आजारी पडतात. रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने शरीर कमजोर होतं आणि व्यक्ती लवकर आजारी पडण्याची शक्यता मोठी असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोगप्रतिकारशक्ती अनेक प्रकारच्या बॅक्टेरियल संक्रमण, फंगस संक्रमणापासून बचाव करते. त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती उत्तम ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची अनेक कारणं असू शकतात. 


रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची कारणं  - 


अधिक वजन किंवा अधिक कमी वजन असणं
धुम्रपान, मद्यपान
शरीराला गरजेनुसार पोषण न मिळणं
वेदना दूर करणाऱ्या औषधांचं अधिक सेवन
झोप पूर्ण न होणं, शरीराला आराम न देणं
अधिक ताण घेणं, आहाराकडे लक्ष न देणं, ही रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याची कारणं असू शकतात. पण रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरु शकतात.


- ग्रीन टी आणि ब्लॅक टी इम्युन सिस्टम वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. पण ते दिवसांतून एक ते दोन वेळाच पिणं योग्य ठरेल. अन्यथा याच्या अधिक सेवनाने नुकसान होण्याची शक्यता असते.


- कच्चा लसून खाणं, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतो. लसूनमध्ये एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियम, व्हिटॅमिन ए आणि ई असतं. 


- दहीच्या सेवनानेही इम्युन पॉवर वाढवली जाऊ शकते. याशिवाय दही पचनक्रियाही चांगली ठेवण्यास मदत करतं. दररोज जेवणात दही खाण्याने, शरीरात इम्युन सिस्टम बॅलेंस ठेवली जाऊ शकते. 


- रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी महत्त्वाचं आहे.  व्हिटॅमिन डीमुळे अनेक रोगांचा सामना करण्याची ताकद मिळते. हाडं मजबूत करण्यासही याचा फायदा होतो. व्हिटॅमिन सीमुळे संक्रमित रोगांपासून बचाव केला जाऊ शकतो. लिंबू, आवळ्याच्या सेवनाने रोग प्रतिकारशक्ती राखण्यास मदत होते. 


- नवजात बाळांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आईचं दूध रामबाण उपाय आहे. यामुळे लहान मुलांमध्ये होणाऱ्या अॅलर्जी, ताप, इन्फेक्शन, अतिसार यापासून बचाव होण्यास  मदत होते.


  


- लठ्ठपणा किंवा दुबळेपणामुळेही रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होत असतो. त्यामुळे शरीरानुसार वजन नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे. शरीरातील अशक्तपणामुळेही इम्युनिटी कमी होते. इम्युनिटी वाढवण्यासाठी योगा, व्यायामही फायदेशीर आहे. 


- हिरव्या भाज्या आरोग्यासाठी उत्तम मानल्या जातात. पालकमध्ये फॉलिक अॅसिड, फायबर, अॅन्टी-ऑक्सिडेन्ट आणि व्हिटॅमिन सी असतं. यामुळे शरीर स्वस्थ राहून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासही मदत होते.