हिवाळ्यात जास्त चहा पिणाऱ्यांनो सावधान; कसं होतंय नुकसान? पाहा...
हिवाळ्यात जवळपास सर्वच लोक थंडीपासून बचाव करण्याच्या निमित्तानं म्हणून चहा पिणं पसंत करतात. परंतु दिवसभरात प्रमाणापेक्षा जास्त चहा पिल्यामुळे त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. जाणून घ्या, जास्त चहा पिल्याने शरीरावर होणारे वाईट परिणाम.
हिवाळ्यात जवळपास सर्वच लोक थंडीपासून बचाव करण्याच्या निमित्तानं म्हणून चहा पिणं पसंत करतात. थंडी दूर पळवण्यासाठी दिवसभरात अनेकदा गरम चहा पिणं हे लोकांसाठी सोयीचं असतं. दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी गरम चहाचा एक कपसुद्धा कित्येक लोकांसाठी पुरेसा ठरतो. परंतु दिवसभरात प्रमाणापेक्षा जास्त चहा पिल्यामुळे त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. ते नेमके कोणते? पाहा...
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, दिवसातून 4-5 कप किंवा त्यापेक्षा जास्त चहा पिणं हे आरोग्यासाठी घातक ठरु शकतं. चहामध्ये असे काही घटक असतात ज्यांचं अधिक प्रमाणातील सेवन शरीरासाठी धोकादायक ठरतं. त्यामुळे चहाचं सेवन कमी करण्याचा किंवा प्रमाणात करण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात.
आरोग्यावर होतात 'हे' वाईट परिणाम
लोहाची कमतरता
चहातील टॅनिक अॅसिड शरीरातील लोहाच्या कमतरतेला कारणीभूत आहे. त्यामुळे चहाचं जास्त सेवन केल्याने शरीरात टॅनिक अॅसिडचे प्रमाण वाढते जेणेकरुन शरीरात लोहाची कमतरता भासू शकते. विशेषत: अॅनिमिया (रक्ताची कमतरता) मुळे ग्रासलेल्या लोकांना प्रमाणापेक्षा जास्त चहाचे सेवन धोकादायक ठरु शकते.
कॅफिनचे अधिक सेवन
चहामध्ये कॅफिन सारखा ऊर्जा वाढवणारा घटक उपस्थित असतो. कॅफिन मेडिटेशन साठी उपयुक्त ठरतो. परंतु कॅफिनचं अधिक सेवन केल्यानं बरेच आजार जडू शकतात. शरीरात कॅफिनचं अधिक प्रमाण निद्रानाश, अस्वस्थपणा तसेच हृदयाचे ठोके वाढण्याला कारणीभूत ठरतात.
हाडं कमजोर होणे
जास्त चहा पिल्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण घटू शकते ज्यामुळे हाडांवर त्याचा वाईट परिणाम होऊन हाडं कमजोर होण्याची शक्यता असते. अधिक प्रमाणात चहा पिणं ऑस्टियोपोरेसिस सारख्या गंभीर आजाराचा धोका वाढवतं.
पचनसंस्थेवर वाईट परिणाम
उपाशीपोटी किंवा सतत चहा पिल्याने अॅसिडीटी सारखी समस्या उद्भवू शकते. शरीरात अॅसिडचं प्रमाण वाढल्यानं पोटदुखी तसंच गॅसेसची समस्या होऊ शकते. चहाचं अधिक सेवन अल्सर सारख्या समस्येला कारणीभूत ठरु शकतं.
चहाच्या सवयीला पर्याय
जर तुम्हाला जास्त चहा पिण्याची सवय असेल तर त्याचे प्रमाण हळू-हळू कमी करा. निश्चित वेळेतच चहा पिण्याचा प्रयत्न करा. चहाला पर्याय म्हणून तुम्ही आलं घातलेला चहा, ग्रीन टी किंवा गरम पाणी पिऊ शकता. या पर्यायांचा अवलंब केल्याने आरोग्य चांगले राहते आणि हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळण्यास मदत होते.
(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)