राज्यातील निवासी डॉक्टरांनी पुकारला बेमुदत संप; रूग्णांना बसणार फटका?
राज्यातील निवासी डॉक्टरांनी आज संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे
मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टरांनी आज संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. निवासी डॉक्टरांकडून हा बेमुदक संप पुकारण्यात आला आहे. डॉक्टराच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे निवासी डॉक्टरांनी संप पुकारण्याचं पाऊल उचललं आहे.
राज्यभरातील 5 हजाराहूंन अधिक निवासी डॉक्टरांनी हा संप पुकारला आहे. राज्यातील जवळपास 18 मेडिकल कॉलेजमधील सुमारे सव्वा पाच हजार निवासी डॉक्टर संपात सहभागी झाले आहेत. रूग्णालयातील अत्यावश्यक सेवेतील आणि कोरोना वॉर्डमधील निवासी डॉक्टर मात्र संपात सहभागी न होता सेवेत कायम राहतील. राज्य सरकारने विविध मागण्यांची पूर्तता न केल्याने मार्डचा संपाचा निर्धार केलाय.
निवासी डॉक्टरांनी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या. सरकारने या मागण्यांची पूर्तता न केल्यामुळे मार्डने संपाचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून डॉक्टरांकडून हा संप पुकारण्यात आला आहे. यामध्ये कोरोना काळातील फी माफ करण्यात यावी ही डॉक्टरांची प्रमुख मागणी आहे.
कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी बजावलेली सेवा आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान लक्षात घेत वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी फी माफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र अजूनही फी माफीचा निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे अखेर निवासी डॉक्टरांनी मागणी मान्य न झाल्यास संपावर जाण्याचं स्पष्ट केलंय.