What is Monkey fever : कोरोनानंतर आता कर्नाटकात मंकी फिव्हरने (Monkey fever in karnataka) धुमाकूळ घातला आहे. मंकी फिव्हरच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने आरोग्य विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले आहेत. अशातच आता गेल्या अडीच आठवड्यात कर्नाटकातील उत्तरा कन्नड जिल्ह्यात या संसर्गजन्य आजाराची प्रकरणं झपाट्यानं वाढली आहेत. 31 बाधित रूग्णांपैकी 12 रूग्णालयात दाखल आहेत तर उर्वरित रूग्ण घरी उपचार घेत असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंकी फिव्हर म्हणजे काय? (Monkey fever disease)


मंकी फिव्हर याला कायसनूर फॉरेस्ट डिसीज (KFD) असंही म्हटलं जातं. हा आजार प्राण्यांपासून माणसांमध्ये पसरण्याचा धोका असतो, असा इशारा आरोग्य तज्ज्ञांनी दिलाय. माकडांच्या शरीरात आढळणाऱ्या टिक्स चावल्यामुळे या आजाराचा धोका असतो. हा Flaviviridae कुटुंबातील विषाणू आहे. भारताच्या काही भागांमध्ये, विशेषतः कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यात या आजाराची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रात देखील मंकी फिव्हर शिरकाव करणार की काय? अशी भीती व्यक्त केली जात आहे.


कायसनूर फॉरेस्ट डिसीज हा ताप 1957 मध्ये पहिल्यांदा ओळखला गेला. या रोगाचं नाव कर्नाटकातील कायसनूर जिल्ह्याच्या नावावरून ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी अनेक माकडांचा मृत्यू झाला होता, त्यामुळे स्थानिक लोकांनी या आजाराचं नाव मंकी फिव्हर ठेवलं होतं.


लक्षणं काय आहेत? (Monkey fever symptoms)


कायसनूर फॉरेस्ट डिसीज या आजारात उच्च ताप येणं, थंडी जाणवणं, स्नायूंमध्ये सतत होणाऱ्या वेदना तसेच डोकेदुखीची समस्या देखील जाणवू लागते. एवढंच नाही तर उलट्यांचा त्रास, रक्तास्त्रावच्या समस्या देखील जाणवू लागतात. यामध्ये प्लेटलेट्सची संख्या कमी होते. तर डोळे दुखणे अन् सुज देखील येते, असं आरोग्य तज्ज्ञ डॉ. नीरज बी यांनी सांगितलं आहे.


कशी काळजी घ्याल?


जंगलात किंवा आसपास राहणाऱ्या लोकांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो कारण हा विषाणू बहुतेक फक्त जंगलात आढळतो. जनावरांशी संपर्क टाळून स्वच्छतेची काळजी घेतल्यास या आजाराचा धोका टाळता येतो, असं आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं आहे. रक्तस्त्राव विकाराची लक्षणं दिसणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचा आणि भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.


दरम्यान, मंकी फिव्हरसाठी एकमेव उपाय म्हणजे लस... दर दोन महिन्यांच्या अंतरावर एक लस दिली जाते. ज्यामुळे संसर्ग टाळता येतो, तसेच रुग्ण दगावण्याची शक्यता देखील कमी होते. एकदा तुम्हाला माकडताप झाला की, तुम्हाला पुढील तीन ते पाच दिवसांत लक्षणे दिसतात, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. नीरज बी यांनी दिली आहे.