कोरोना नव्हे, हे इन्फेक्शन करणार घात, कसा ते पाहा...
कोरोना व्हायरस केव्हा संपणार याबाबत कोणालाही उत्तर माहित नाही. मात्र या व्हायरसचे दुष्पपरिणाम दिसून येतायत.
मुंबई : कोरोना व्हायरस केव्हा संपणार याबाबत कोणालाही उत्तर माहित नाही. मात्र या व्हायरसचे दुष्पपरिणाम दिसून येतायत. विशेषत: ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे किंवा ज्यांना आधीच काही गंभीर आजार आहेत, त्यांनाही अधिक धोका आहे. कोरोनाची लागण झाल्यावर सेप्सिसचा धोका वाढत असल्याचं समोर आलं आहे. डब्ल्यूएचओने देखील इशारा दिला आहे की सेप्सिस हा कॅन्सर आणि हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा अधिक धोकादायक असणार आहे.
डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते, 2050 पर्यंत कॅन्सर आणि हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा सेप्सिसमुळे जास्त लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या मते, सेप्सिस ही संसर्गाची सिंड्रोमिक रिएक्शन आहे आणि संसर्गजन्य रोग हे जगभरात मृत्यूचं प्रमुख कारण आहेत.
लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, 2017 मध्ये जगभरात 489 दशलक्ष प्रकरणं आणि 11 दशलक्ष सेप्सिस संबंधित मृत्यू होते, जे जागतिक मृत्यूच्या संख्येच्या 20 टक्के आहे.
अफगाणिस्तान वगळता इतर दक्षिण आशियाई देशांच्या तुलनेत भारतात सेप्सिसमुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचंही अभ्यासातून समोर आले आहे. गुरुग्रामच्या इंस्टीट्यूट ऑफ क्रिटिकल केयर अँड एनेस्थिसियोलॉजी, मेदांता द मेडिसिटीचे अध्यक्ष यतीन मेहता म्हणाले, “सेप्सिस 2050 पर्यंत कॅन्सर किंवा हृदयविकाराच्या झटक्यापेक्षा जास्त लोकांचा बळी घेऊ शकतो. हा सर्वात मोठा किलर ठरणार आहे. भारतासारख्या विकसनशील देशात, अँटीबायोटिक्सचा अति वापर बहुधा उच्च मृत्यूचं कारण बनत आहे.
डेंग्यू, मलेरिया, यूटीआय किंवा अगदी डायरिया सारख्या अनेक सामान्य आजारांमुळे सेप्सिस देखील होऊ शकतो. डॉ मेहता म्हणाले, अँटीबायोटीक्सचा वापर करण्याव्यतिरिक्त, कमी जागरूकता आणि तत्काळ उपचारांचा अभाव हे देखील धोक्याचे एक मोठं कारण आहे.