आता किडनी ट्रान्सप्लांटची गरज नाही? कृत्रिम किडनी तयार करण्यात यश
कृत्रिम किडनी तयार करण्यात यश, डायलिसिसपासूनही सुटका होणार
कृष्णात पाटील झी 24 तास मुंबई : हे साधसुधं मशिन नाही. तुम्ही बघताय ही आहे जगातील पहिली कृत्रिम किडनी. अमेरिकेतील संशोधकांना कृत्रिम किडनी तयार करण्यात यश आलं आहे. या किडनीच्या मानवी चाचण्याही यशस्वी झाल्यात.
अमेरिकेचं आरोग्य मंत्रालय आणि अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रोलॉजी यांच्या पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपमधून 'द किडनी प्रोजेक्ट' या नावानं हे संशोधन करण्यात आलं. सॅन फ्रान्सिस्कोतील शुवो राय आणि वंडलबिल्ट विद्यापीठातील विल्यम फिसेल यांच्या नेतृत्वाखालील टीम गेल्या काही वर्षांपासून यावर काम करत होती.
या कृत्रिम किडनीमध्ये दोन प्रमुख भाग आहेत. हिमोफिल्टर आणि बायोरिअॅक्टर. हिमोफिल्टर रक्तातून अनावश्यक आणि विषारी पदार्थ वेगळे काढतो. तर बायोरिअॅक्टर रक्तात इलेक्ट्रोलाईट्सचं संतुलन करण्यासारखी किडनीची इतर कामं करतो. स्मार्टफोनच्या आकाराचं हे उपकरण रुग्णाच्या किडनीच्या जागेवर बसवण्यात येतं. सध्या याची किंमत साडेसहा लाख डॉलर्स निश्चित करण्यात आली आहे.
किडनी फेल झाल्यास रुग्णाला दर आठवड्याला डायलिसीस करून घ्यावं लागतं. फिल्टर केलेलं रक्त द्यावं लागतं आणि या प्रक्रियेत काहीसा धोका असतोच. किडनी ट्रान्सप्लांट हा पर्याय असला तरी डोनरची कमतरता असते. मॅच होणारी किडनी मिळेपर्यंत अनेकदा रुग्णाचा जीवही जातो. अशा वेळी ही कृत्रिम किडनी वरदान ठरणार आहे.