मुंबई : देशभरात कोरोनाची प्रकरण वाढत असताना केंद्र सरकारने 15-18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी मंजूरी दिली आहे. यानंतर देशात मुलांच्या लसीकरणाला सुरुवात देखील झाली. याच दरम्यान भारत बायोटेकने मोठं विधान केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुधवारी भारत बायोटेकने सांगितलं की, कोविड-19 लसीच्या कोवॅक्सिनच्या डोसनंतर कोणतेही वेदनाशामक किंवा पॅरासिटेमॉल औषध देण्याची शिफारस करण्यात आलेली नाही.


यासंदर्भात भारत बायोटेकने ट्विटवर लिहिलं आहे की, “आम्हाला समजलं की, की काही लसीकरण केंद्रांवर मुलांना कोवॅक्सिन लसीच्या डोसनंतर पॅरासिटेमॉलचा 500 मिलीग्राम डोस घेण्यास सांगण्यात आलं. मात्र कोवॅक्सीन लस दिल्‍यानंतर पॅरासिटेमॉल किंवा कोणतीही पेनकिलर घेऊ नये, असं आम्ही स्पष्ट करू इच्छितो."


कंपनीकडून असंही सांगितलं की, "30 हजारांहून अधिक लोकांवर केलेल्या क्लिनिकल चाचण्यांदरम्यान सुमारे 10-20 टक्के लोकांमध्ये दुष्परिणाम दिसून आले होते. परंतु हे दुष्परिणाम सौम्य प्रमाणात होते. आणि हे दुष्परिणाम कोणतंही औषध न घेता तो एक-दोन दिवसात बरे झाले. कोणत्याही औषधाची गरज लागली नव्हती. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच औषध घ्यावं."


पॅरासिटेमॉल कोरोनाच्या उर्वरित लसीसोबत घेण्याची शिफारस केली जाते, परंतु कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर त्याची आवश्यकता नसते, असंही कंपनीने सांगितलं आहे.