दिल्ली : सुट्ट्यांच्या दिवशी बँका बंद असल्या की तरीही आपण एटीएमच्या माध्यमातून पैसे काढू शकतो. त्यातप्रमाणे आता तुम्हाला औषधंही उपलब्ध होणार आहेत. जरी दुकानं बंद असली तरीही आता एटीएमच्या माध्यमातून तुम्हाला औषधं मिळू शकणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात आता औषधांचं एटीएम सुरु करण्यात आलं आहे. देशातील प्रत्येक ब्लॉकमध्ये औषधांचं हे मशीन बसवण्यात येणार आहे. या माध्यमातून दुर्गम भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आता 24 तास औषधं उपलब्ध होऊ शकणार आहेत. देशातील एकूण 6 हजार ब्लॉक्समध्ये हे मशीन लावण्यात येणार आहे. 


कसं काम करेल हे एटीएम?


तुमच्या डॉक्टरांनी दिलेलं प्रिस्क्रिप्शन या मशीनमध्ये टाकावं लागणार आहे. आणि त्यानंतर ही औषधं उपलब्ध होऊ शकणार आहेत. केंद्र सरकारच्या कॉमन सर्व्हिस सेंटर आणि आंध्र प्रदेशमधील ATMZ या संस्थेमध्ये या पद्धतीचा करार झाला आहे. 


गर्भधारणा, कोरोना तपासणी, ऑपरेशन संबंधी औषधं त्याचप्रमाणे इतर अनेक वैद्यकीय उपकरणं आणि विविध प्रकारची औषधं या एटीएममधून नागरिकांना मिळणार आहेत. 


मिळालेल्या माहितीप्रमाणे, या एटीएम मशिनमधून जेनेरिक औषधं ठेवण्यात येण्याची शक्यता आहे. जेणेकरून नागरिकांना जेनेरिक औषध मिळेल. या एटीएमना ई-कॉमर्स कंपन्यांकडून औषधांचा पुरवठा केला जाणार आहे. या एटीएममुळे नागरिकांना आता पैशाप्रमाणे औषधंही 24 तास उपलब्ध होऊ शकणार आहेत.