मुंबई : कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान ही तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचंही म्हटलं जातंय. दरम्यान मुलांसाठी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासातून लहान मुलांसाठी कोरोना विरूद्ध गोवरची लस फायदेशीर असल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये यासंदर्भात संशोधन करण्यात आलं. या संशोधनानुसार, मुलांना गोवरची लस कोरोनापासून संरक्षण देण्यात प्रभावी ठरत आहे. अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की, गोवरची लस मुलांमध्ये कोरोना संसर्गापासून लवकर संरक्षण देते. या अभ्यासामध्ये 1 वर्षापासून 17 वर्षांपर्यंतच्या 548 मुलांचा समावेश केला गेला होता.


हा अभ्यास करण्यासाठी यामध्ये समावेश केलेल्या मुलांना दोन गटांमध्ये विभागण्यात आलं. यामध्ये एक गट कोरोना संक्रमित (आरटी-पीसीआर चाचणी) मुले आणि दुसरा सामान्य मुलांचा होता. संशोधनात असं दिसून आलं आहे की SARS-Co-V-2 विरूद्ध गोवरची लस 87% पर्यंत प्रभावी होती. तसंच गोवर लस घेतलेल्या मुलांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका ही लस न घेणाऱ्या मुलांपेक्षा कमी होता.


हे संशोधन नुकतंच ह्यूमन वॅक्सिन अँड इम्यूनोथेरेपेटिक या इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. संशोधकांच्या म्हणण्याप्रमाणे, त्यांच्या अभ्यासाचे निकाल जरी चांगला असला तरी अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी मोठ्या स्तरावर चाचणी करणं आवश्यक आहे.  


या अभ्यासाचे आघाडीचे अन्वेषक निलेश गुजर म्हणाले, संभाव्य रॅंडम क्लिनिकल ट्रायलद्वारे या संशोधनाची आणखी पुष्टी करणं आवश्यक आहे.


गोवरची लस 9 महिने आणि 15 महिन्यांच्या वयाच्या मुलांना दिली जाते. सन 2018 मध्ये, केंद्र सरकारने 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी लसीकरण कार्यक्रम सुरू केला होता. पुण्यातील या संशोधनात सामील झालेल्या मुलांची या लसीकरणाची नोंद होती.