ओमायक्रॉन धोकादायक ठरू शकतो; WHO चा पुन्हा इशारा
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधोनोम यांनी लोकांना ओमायक्रॉनच्या धोक्यांबाबत इशारा दिला आहे.
दिल्ली : ओमायक्रॉन व्हेरिएंट अनेक देशांमध्ये पसरला आहे. भारतातही ओमायक्रॉनची लागण झालेल्या रूग्णांची संख्या वाढतेय. अशातच आता WHO ने पुन्हा एकदा ओमायक्रॉनबाबत नागरिकांना इशारा दिला आहे. बुधवारी पत्रकार परिषदेत डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी लोकांना ओमायक्रॉनच्या धोक्यांबाबत इशारा दिला आहे.
टेड्रोस म्हणाले की, कोविड -19 चा ओमायक्रॉन व्हेरिएंट अतिशय धोकादायक आहे. विशेषत: ज्यांनी अजून लस घेतली नाही त्यांच्यासाठी हा धोकादायक ठरेल. ओमायक्रॉनमुळे जगभरात प्रकरणं वाढलीयेत, परंतु त्याविरुद्ध लढण्याची हिंमत आपण हरता कामा नये.
टेड्रोस म्हणाले, "जरी ओमायक्रॉन डेल्टपेक्षा कमी गंभीर आहे, तरीही हा एक धोकादायक व्हेरिएंट आहे. आफ्रिकेत, 85 टक्क्यांहून अधिक लोकांना अजून लस डोस मिळालेली नाही. आपण कोरोनाच्या या महामारीला तोपर्यंत संपवू शकत नाही जोपर्यंत लसीची ही कमी भरून निघत नाही."
टेड्रोस म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लस कोरोना आणि मृत्यूच्या गंभीर प्रकरणांपासून संरक्षण करते. परंतु संसर्गाचा प्रसार पूर्णपणे थांबवत नाही.
"अजून आणखी व्हेरिएंट येण्याचा धोका आहे, जे ओमिक्रॉनपेक्षा वेगाने पसरू शकतात आणि ते अधिक जीवासाठी धोकादायक अशू शकतात. जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दर आठवड्याला सुमारे 50 हजार झाली आहे," असंही ते म्हणालेत