Omicron Variant : देशात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अशातच ओमायक्रॉनबाबत केंद्र सरकारनं धोक्याचा इशारा दिला आहे. ओमायक्रॉनला हलक्यात घेणं महागात पडू शकतं असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं बजावलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओमायक्रॉन हा सर्दीचा साधा आजार नाही. लक्षणं सौम्य असली तरी तो घातक कोरोनाचाच व्हेरियंट आहे. त्यामुळं लोकांनी दक्षता घ्यावी असं आवाहन  टास्क फोर्सचे प्रमुख आणि निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी केलं आहे. देशात 300 जिल्ह्यांमध्ये ओमायक्रॉनचे रूग्ण वाढतायेत. 


संसर्गदरही 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ओमायक्रॉननं जगात 115, तर भारतात 1 बळी घेतलाय, याकडंही पॉल यांनी लक्ष वेधलं आहे. रूग्णांवर औषधांचा भडीमार करू नका असा सल्लाही त्यांनी डॉक्टरांना दिला आहे. 


ओमायक्रॉन किती धोकादायक आहे मध्यप्रदेशमधील एका प्रकरणावरुन अधिक स्पष्ट होतं. रीवातील शेतकरी धर्मजय सिंह यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर तब्बल आठ महिने उपचार सुरू होते. 8 कोटींपेक्षा जास्त खर्च झाला. धर्मजय यांच्यावरील उपचारासाठी कुटुंबियांना 50 एकर जमीन विकावी लागली. तरीही त्यांचा जीव वाचू शकला नाही.
 
देशात गेल्या 24 तासांत अडीच लाख नव्या कोरोना रूग्णांची भर पडलीय. ओमायक्रॉन रूग्णांची संख्याही 5 हजार 588 इतकी झालीय. दर दहा दिवसात कोरोना रूग्णांची संख्या सहा पटीनं वाढतेय, ही निश्चितच चिंतानजक बाब आहे. त्यामुळे ओमायक्रॉनला हलक्यात घेण्याची चूक करू नका.