One Chip Challenge 14 year Old Boy Died: अमेरिकेमध्ये सुरु असलेल्या 'वन चिप्स चॅलेंज'संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील मॅसॅच्युसेट्समधील वॉर्सेस्टरमध्ये राहणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा फार मलालेदार चिप्स म्हणजेच वेफर्स खाल्ल्याने मृत्यू झाला आहे. अमेरिकन तरुणाईमध्ये सध्या चर्चेचा विषय असलेल्या 'वन चिप्स चॅलेंज'मध्ये तरुण मोठ्या संख्येनं सहभागी होत आहे. या चॅलेंजमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांसमोर जगातील सर्वात मसालेदार टॉर्टिया चिप्स खाण्याचं आव्हान देण्यात आलं होतं. हे चिप्स खाताना स्वत:चा व्हिडीओ शूट करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. हे सर्वात तिखट चिप्स खाण्याच्या चॅलेंजदरम्यान इतर कोणतीही गोष्ट खाण्यास परवानगी नव्हती. हॅरीस वालोबा नावाच्या 14 वर्षीय मुलाने शुक्रवारी या चॅलेंजमध्ये भाग घेतला होता. यानंतर काही तासात या मुलाचा मृत्यू झाला.


शवपेटीच्या आकाराच्या बॉक्समध्ये येतात या चिप्स


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातील सर्वात मसालेदार टॉर्टिया चिप्स हे पाकी (Paqui) नावाच्या कंपनीची निर्मिती आहेत. काळ्या रंगाचे हे चिप्स शवपेटीच्या आकाराच्या डब्ब्यात येतात. यावर दिलेल्या इशाऱ्यानुसार हे चिप्स लहान मुलांपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. हे चिप्स केवळ वयस्कर लोकांसाठी आहेत असंही या कंटेनरवर लिहिण्यात आलं आहे. हे मसालेदार चिप्स तिखट खाण्याची सवय नसलेल्या, व्याधीग्रस्त आणि एलर्जी असलेल्या लोकांपासून दूरच ठेवावेत असंही कंपनीने सांगितलं आहे. मरण पावलेल्या हॅरिसच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा मृत्यू फार मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शरीरामध्ये निर्माण झालेली हीट आणि प्रकृतीसंदर्भातील गुंतागुंतीमुळे झाला.


शाळेतून फोन आला अन्...


'वन चिप्स चॅलेंज'संदर्भात पाकी (Paqui) कंपनीच्या वेब पेजवर माहिती दिली आहे. चिप्स खाल्ल्यानंतर ज्या व्यक्तींना श्वास घेण्यासंदर्भातील आजार आहेत, तिखट खाल्ल्यानंतर ज्यांची शुद्ध हरपते किंवा मळमळल्यासारखं होतं त्यांनी कोणतीही समस्या जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं सांगण्यात आलं आहे. हॅरिसची आई लोइस वालोबा यांनी हा सारा प्रकार शाळेत घडल्याचं 'एनबीसी 10 बोस्टन डॉट कॉम'ला दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं. "शुक्रवारी सायंकाळी मला हॅरिसच्या शाळेत बोलावून घेण्यात आलं. या ठिकाणी एका नर्सने मला हॅरिसने त्याच्या मित्राने दिलेल्या चिप्स खाल्ल्याचं सांगितलं. या चिप्समुळे हॅरिसच्या पोटात फार दुखत असल्याचंही तिने मला सांगितलं," असं हॅरिसची आई म्हणाली. 


नक्की वाचा >> महिलांची 'ती' अचडण दूर करण्यासाठी झाला Maggi चा जन्म! 'मॅगी' नावामागील लॉजिक काय?


तो बेशुद्ध पडला त्यानंतर...


"घरी आल्यानंतर हॅरिसची प्रकृती ठीक होती. त्यानंतर तो बास्केटबॉलच्या पात्रता फेरीसाठी घराबाहेर पडत असतानाच त्याला चक्कर आली," असंही त्याच्या आईने सांगितलं. तातडीने हॅरिसला जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. हॅरिसच्या मृत्यूचं नेमकं कारण कळू शकलं नाही. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्यामधूनच आता काही माहिती मिळू शकते असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.