तृप्ती गायकवाड,झी मीडिया,मुंबई : रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा वाईट परीणाम स्त्रियांच्या मासिक पाळीवर ही मोठ्या प्रमाणात होत आहे.त्यामुळे अनेक स्त्रिया पीसीओएस आणि पीसीओडीच्या समस्याला सामोरं जात आहेत. असं म्हटलं जातं की, पुर्वीच्या काळी स्त्रियांचा आहार आणि व्यायाम योग्य रीतीने होत असल्याने त्यावेळी स्त्रियांना मासिक पाळीशी संबंधीत आजार होण्याचं प्रमाण कमी होतं. आताच्या धावपळीच्या आयुष्यात  खाण्या-पिण्याच्या सवयींपासून ते कपडे परीधान करण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे शरीराच्या जडणघडणीवर याचा विपरीत परीणाम होतो. आज आपण जाणून घेऊयात मासिकपाळीच्या संबंधीत काही घरगुती उपाय काय करावेत? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही स्त्रियांना मासिकपाळी ही असंतुलित असते. कधी अतिरिक्त रक्तस्त्राव तर कधी दोन ते तीन महिने पाळी न येण्याच्या त्रास होत असतो . त्यामुळे मासिकपाळीच्या नैसर्गिक चक्रामध्ये अडथळे येतात. असं म्हटलं जातं की, पुर्वीच्या काळी स्त्रिया जात्यावर दळण दळत असत. यामुळे पोटाचा व्यायाम व्हायचा. तुम्ही जर घरी झाडू मारणं, लादी पुसणं अशी घरची कामं करत असाल तर त्यामुळे गर्भाशयाच्या संबंधीत स्नायू मोकळे होतात. 


कॉटनचे कपडे परीधान करणं फायदेशीर 
मासिक पाळीत शरीराचं तापमान वाढतं. त्याशिवाय पायात क्रॅम्प्स् येणं, ओटीपोटात दुखणं हे शारीरिक त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतात. त्यामुळे जास्त घट्ट कपडे न वापरता मोकळे कपडे परीधान करणं फायदेशीर ठरतं. असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. 


उष्णवर्धक पदार्थ खाणं टाळा 
मासिक पाळी ,सुरू असताना शरीरीला थंडावा मिळेल असे पदार्थ खाणं फायदेशीर ठरतं. मासिक पाळीच्या काळात रक्तस्त्राव जास्त होत असतो, त्यामुळे उष्णवर्धक पदार्थ जसं की खजूर, तीळ, पपई , मसाल्याचे पदार्थ खाणं टाळावं. सब्जा, जीऱ्याचं पाणी , नारळाचं हे पाणी निसर्ग: शरीराला थंडावा देतात. त्यामुळे शरीराचा थकवा कमी होतो. त्याचप्रमाणे पाळीत होणारा रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते. 


शरीराची स्वच्छता राखणं महत्त्वाचं 
मासिक पाळीच्या काळात शरीराची स्वच्छता राखणं महत्त्वाचं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर तुम्ही सॅनिटरी पॅड वापरत असाल तर दिवसभरात तुम्ही तीन ते चार वेळा पॅड बदलणं गरजेचं आहे. मासिक पाळी सुरू असाताना रात्री झोपण्यापुर्वी अंघोळ करून झोपल्याने अंतर्गत शरीराची स्वच्छता होते. त्यामुळे रात्री शांत झोप लागते.


छंद जोपासणं
मासिक पाळीच्या काळात चिडचिड होणं, अतिविचार करणं यामुळे मानसिक नैराश्य मोठ्या प्रमाणात येतं. अशा वेळी  स्वत: चे  छंद जोपासणं, तुमच्या हॉलमध्ये किंवा बेडरुममध्ये फुलं  ठेवल्याने मन प्रसन्न होते. तसंच आवडीची गाणी ऐकणं किंवा सकाळी कोवळ्या उन्हात बाहेर फिरणं, यामुळे मानसिक आरोग्य संतुलित राहते. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)