मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी झालेला दिसतोय. देशात वर्षाच्या सुरुवातीला आलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसतेय. तसंच तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, आता तिसरी लाट येण्याची शक्यताही कमी वाटतेय. दरम्यान कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर आता तज्ज्ञांनी असं मत व्यक्त केलं आहे की, कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतर कमी करायला हवं. भारतात वेगाने लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यायला पाहिजे असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.


संपूर्ण देशभरात लसीकरण मोहिमेला वेग देण्यात येतोय. यामध्ये देशभरातील नागरिकांना कोविशील्ड, कोवॅक्सिन तसंच स्पुतनिक आणि इतर लसी देण्यात आल्यात आहेत. तर यामध्ये 80 टक्के वाटा हा केवळ कोविशील्ड लसीचा आहे.


कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवसांचं आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 87 टक्के लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळालाय. तर दोन डोस घेतलेल्यांचं प्रमाण 47 टक्के असल्याची माहिती आहे. 


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, जोपर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांचं प्रमाण वाढणार नाही, तोपर्यंत कोरोनाचं संक्रमण आणि नव्या व्हेरिएंटचा धोका कायम राहणार आहे. हा धोका कमी करायचा असल्यास दुसरा डोस लवकर पूर्ण करायला हवा. त्यासाठी दोन डोसमधील अंतर 4 ते 6 आठवड्यांवर आणायला पाहिजे.