त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी रक्तचंदन फायदेशीर

आपल्या नेहमीच्या धावपळीत त्वचेशी निगडीत अनेक समस्या वाढतात.
मुंबई: आपल्या नेहमीच्या धावपळीत त्वचेशी निगडीत अनेक समस्या वाढतात. अॅक्ने, त्वचा काळवंडणे, ब्रेकआऊट्स अशा अनेक लहान सहान समस्यांवर प्रत्येकवेळीच ब्युटीपार्लरमध्ये ट्रीटमेंट घेणं शक्य नसतं. अशावेळेस काही नैसर्गिक उपायांनी त्वचेच्या समस्या दूर ठेवण्यास मदत होते. रक्तचंदन हा आयुर्वेदातील असाच एक उपाय आहे. पावडर किंवा काडीच्या स्वरूपात रक्तचंदन बाजारात उपलब्ध असतं. त्वचेचं आरोग्य खुलवण्यासाठी रक्तचंदन फायदेशीर आहे.
कसा कराल रक्तचंदनाचा समावेश
रक्तचंदन आणि लिंबू
1 टेबलस्पून रक्तचंदनामध्ये लिंबाचे काही थेंब मिसळा. हा पॅक चेहर्यावर नीट पसरवून लावा. सुमारे 15-20 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा.
तेलकट त्वचा असणार्यांमधील समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी रक्तचंदन फायदेशीर आहे. यामुळे त्वचेवरील पोअर्स टाईट होण्यास मदत होईल. तसेच अतिरिक्त सेबम आटोक्यात ठेवण्यास मदत होते.
रक्तचंदन, हळद, मधाचा पॅक
रक्तचंदन काडीच्या स्वरूपात असल्यास ते गुलाबपाण्यामध्ये उगाळा. यामध्ये चमचाभर मध, हळद मिसळा.
रक्तचंदनाचा हा पॅक चेहर्यावर लावा. नैसर्गिकरित्या पॅक पूर्णपणे सुकल्यानंतर कोमट पाण्याने तो स्वच्छ धुवावा.
या रक्तचंदनाच्या पॅकमुळे पिंपल्समुळे चेहर्यावर पडणारे डाग, अॅक्ने कमी होण्यास मदत होते. यामधील थंडावा चेहर्याच्या त्वचेतील दाह कमी करण्यास मदत होते.
रक्तचंदन आणि दही
चमचाभर रक्तचंदनाच्या पावडरमध्ये दही आणि हळद मिसळा. हा फेसपॅक चेहर्यावर लावा काही मिनिटांनी स्वच्छ धुवावा. आठवड्यातून दोनदा हा फेसपॅक लावल्याने चेहर्यावरील अनेक समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते.
पिग़मेंटेशन, त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी, स्कीन टोन सुधारण्यासाठी हा पॅक फायदेशीर आहे.