दिलासादायक! देशात मार्च 2020नंतर सक्रिय रुग्णसंख्येत मोठी घट
कोरोनाच्या एक्विव्ह रूग्णांच्या संख्येत विक्रमी घट झाली आहे.
मुंबई : देशात कोरोनाच्या रूग्णसंख्येमध्ये काही प्रमाणात घट होताना दिसतेय. इतकंच नाही तर कोरोनातून बरं होणाऱ्यांची संख्या वाढतेय. गेल्या 24 तासांमध्ये भारतात 11,919 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासोबतच एक्विव्ह रूग्णांच्या संख्येत विक्रमी घट झाली आहे.
आरोग्यमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 1,28,762 आहे, जी एकूण प्रकरणांच्या 0.37 टक्के आहे. हा दर मार्च 2020 नंतरचा सर्वात कमी आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासांत साथीच्या आजारामुळे 470 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11,242 लोक बरे झाले आहेत.
11,919 नवीन प्रकरणांपैकी 6849 प्रकरणं केरळमधूनच नोंदवण्यात आली आहेत. त्याच वेळी, केरळमध्ये गेल्या 24 तासांत 61 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 6046 लोक बरे झाले असल्याची नोंद आहे.
ठाण्यात कोरोनाच्या 139 नव्या रूग्णांची नोंद
महाराष्ट्रातील ठाण्यात कोरोनाचे 139 नवीन रुग्ण आढळले आहेत. ठाण्यामध्ये संक्रमितांची संख्या 5,68,042 झाली आहे. तर संसर्गामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 11,564 वर पोहोचली आहे. ठाण्यातील ही आकडेवारी बुधवारची आहे.
कोरोनाचा संसर्ग दर 0.97 टक्के आहे, जो गेल्या 45 दिवसांपासून 2 टक्क्यांच्या खाली आहे. त्याच वेळी, लसीकरणाच्या बाबतीत, भारताने आतापर्यंत कोरोना लसीचे 114.46 कोटी डोस दिले आहेत.