मुंबई : रक्ताचा कर्करोग असणाऱ्या मुंबईतील ३९ वर्षीय व्यक्तीवर बोन मॅरो ट्रान्सप्लांट करून उपचार करण्यात आली आहे. लॉकडाऊनमध्ये कर्करोग असल्याचं निदान झाल्याने कुटुंबियांना चिंता लागून राहिली होती. परंतु परळ येथील ग्लोबल रूग्णालयात या रूग्णाचे बोन मॅरो प्रत्यारोपण करून कर्करोगावर यशस्वी उपचार करण्यात आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पेशाने साँफ्टवेअर इंजिनियर असणा-या ३९ वर्षीय श्रीकांत महाडिक गेल्या काही महिन्यांपासून त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवू लागला होता. प्रकृती अधिकच खालावू लागल्याने कुटुंबियांनी त्यांना परळ येथील ग्लोबल रूग्णालयात दाखल केलं. या ठिकाणी वैद्यकीय चाचण्याअंती त्यांना ल्यूकेमिया (रक्ताचा किंवाव अस्थिमज्जेचा कर्करोग) असल्याचं निदान झाले आणि त्वरीत बोन मँरो प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय शिल्लक असताना रूग्णालयातील वरिष्ठ सल्लागार हेमँटोलॉजी डॉ. अभय भावे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्य डॉक्टरांच्या टीमने हे यशस्वी प्रत्यारोपण करत रूग्णाला जीवनदान दिले आहे.


रक्ताचा कॅन्सर असलेल्या रूग्णाच्या शरीरात रक्त कमी होते. प्लेटलेट्सच्या संख्येत झपाट्याने घट होते व हाडे दुर्बल होतात. अशा स्थितीत बोन मॅरो प्रत्यारोपण हे अतिशय फायदेशीर ठरू शकते. याचा प्रत्यय नुकताच आला आहे मुंबईकर असलेल्या महाडीक यांच्या कुटूंबियाना आला.



फेब्रुवारी महिन्यात या रूग्णाला ल्यूकेमिया म्हणजेच रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. हा रूग्ण उपचारासाठी आल्यानंतर त्याला किमोथेरपी सुरू करण्य़ात आली. परंतु मार्च महिन्यात लॉकडाऊन करण्यात आल्याने कोरोना रूग्णांमुळे बरीच रूग्णालये बंद पडली होती. त्यामुळे शस्त्रक्रिया रखडली होती अशी माहिती बोन मॅरो ट्रान्सप्लांट फिजीशियन डॉ. श्रीनाथ क्षीरसागर यांनी दिली. 


या आजारात शरीरातील रक्तपेशींवर कॅन्सरच्या पेशी हल्ला चढवतात. यामुळे शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होऊ लागतात. अशा स्थितीत रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन सर्दी, ताप व न्यूमोनियासारखे संसर्गजन्य आजार होतात. या रूग्णालाही कोविड-१९ ची लागण झाली होती. त्यामुळे कुटुंबियांच्या चिंतेत अजूनच वाढ झाली होती. परंतु, दोन आठवडे योग्य उपचारानंतर त्यांनी कोरोनावर मात केल्याचे डॉ.क्षीरसागर म्हणाले. 


जुलै महिन्यात प्रकृती खालावू लागल्याने डॉक्टरांनी रूग्णाचे प्राण वाचवण्यासाठी बोन मॅरो प्रत्यारोपण करण्याचा निर्णय घेतला. रक्ताच्या काही विशिष्ट आजारांमध्ये रूग्णाला बोन मॅरो प्रत्यारोपण करावे लागते. हे रक्तातील मूळ पेशींचे रोपण असते. त्यानुसार रूग्णाच्या भावाकडून बोनमॅरो घेऊन प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आता रूग्णाची प्रकृती उत्तम असून त्यांना घरी सोडण्यात आल्याचेही ते म्हणाले.
 
रक्ताचा कर्करोग असल्याचे कळल्यावर आता माझ्या कुटुंबियांचे काय होणार या विचाराने मी चिंतेत होतो. परंतु, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मला नव्याने आयुष्य मिळाल्याचे  रूग्ण श्रीकांत महाडिक यांनी सांगितले. 


विषाणूवर प्रतिबंध घालण्यासाठी कठोर उपाययोजना करत असताना, कोविड नसलेल्या रुग्णांनाही सुरक्षित उपचार मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. लॉकडाऊन दरम्यान बोन मॅरो दाता मिळाल्याने रूग्णाचा जीव वाचवलं डॉक्टरांना शक्य झाल्याचे  ग्लोबलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विवेक तैलालीकर यांनी सांगितले.