नवी दिल्ली : जवळपास दोन वर्षांपासून जगभरातील लोक कोरोना व्हायरसच्या कहरामुळे त्रस्त आहेत. या विषाणूबाबत जगभरातील शास्त्रज्ञ विविध संशोधन करत असले तरी अद्याप कोणालाच याबाबत अचूक माहिती मिळालेली नाही. कोरोनाबाबत रोज नवीन खुलासे होताना दिसतायत. याच दरम्यान कोरोनाबाबत सर्वात धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या संशोधनात असं आढळून आलं आहे की, कोरोना विषाणू चाचणीचे निकाल दिवस आणि रात्रीनुसार बदलू शकतात.


कोरोनाची लागण कधी झाली यावर परिणाम अवलंबून


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका अमेरिकन अभ्यासाच्या आधारे हा दावा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या वँडरबिल्ट युनिव्हर्सिटी मेडिकल सेंटरने आपल्या अभ्यासानंतर दावा केला आहे की, व्हायरसचं काम वेळ आणि मानवी शरीराच्या घड्याळानुसार बदलतं. सोप्या भाषेत सांगायचं तर, जर तुम्ही सकाळी कोरोना चाचणी केली तर त्याचे परिणाम रात्री केलेल्या निकालांपेक्षा वेगळे असू शकतात. यासोबतच तुमच्या झोपे-जागण्याच्या चक्राचाही कोरोना चाचणीवर परिणाम होतो.


दुपारच्या वेळेस मिळतो योग्य अहवाल


कोरोनावरील अमेरिकन अभ्यासात असाही दावा केला जात आहे की, कोरोना चाचणीचे निकाल दुपारी अचूक येण्याची शक्यता आहे. एखाद्या व्यक्तीचा नमुना सकाळी किंवा रात्री न घेता दुपारी घेतल्यास चाचणीचा अचूक निकाल येण्याची दुप्पट शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


दुपारी केलेल्या कोरोना चाचणीचा खोटा नकारात्मक निकाल येण्याची शक्यता खूपच कमी आहे. फॉल्स निगेटिव्ह म्हणजे एखाद्याला संसर्ग झाला आहे, त्यानंतरही त्यांची चाचणी निगेटिव्ह येते.


दिवसभर अ‍ॅक्टिव्ह असते आपली इम्यून सिस्टीम


इतर अनेक विषाणू आणि बॅक्टेरिया इत्यादींप्रमाणे, कोरोना विषाणूचे देखील व्यक्तीच्या शरीराच्या घड्याळानुसार वेगवेगळे परिणाम होतात. असं मानलं जातं की, दिवसभरात एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती अधिक सक्रिय असते आणि या काळात विषाणूचे प्रमाणही जास्त असते. त्यामुळे यावेळी योग्य परिणाम मिळण्याची शक्यता जास्त असते. या अभ्यासात कोरोना विषाणूची चाचणी आणि उपचाराची नवीन पद्धत अवलंबण्याची सूचनाही करण्यात आली आहे.