Corona : टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितले 4 महत्त्वाचे मुद्दे
बेफिकीरीने वागणं धोकादायक ठरणार असल्याचं महाराष्ट्र टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितलंय.
मुंबई : राज्यात कोरोना पुन्हा डोकं वर काढू लागलाय. गेल्या 24 तासांमध्ये 3900 कोरोनाच्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. एकीकडे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रूग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जातेय. त्यामुळे आता बेफिकीरीने वागणं धोकादायक ठरणार असल्याचं महाराष्ट्र टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी सांगितलंय.
डॉ. ओक झी 24 तासशी बोलताना म्हणाले, "सध्याचा काळ हा बेफिकीरीने वागण्याचा काळ नाहीये. ही बेफीकीरी अंगास येऊ शकते. असं केल्यास रूग्णसंख्या वाढून आरोग्य व्यवस्थेवर ताण येईल. त्यामुळे आता आपल्या वागणुकीवर बंधनं घातली पाहिजेत."
राज्यात काही ठिकाणी शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. यावर बोलताना डॉ. ओक म्हणाले, "शाळा, कॉलेजमध्ये मुलांच्या लसीकरणाला आमचा विरोध आहे. कारण लसीकरणानंतर मुलांना चक्कर, उलटी आल्यास त्याठिकाणी उपचार देणं अवघड जाईल. त्यामुळे मुलांचं सरकारी आणि खाजगी रूग्णालयांमध्येच हे लसीकरण व्हावं."
कमी काळात मोठ्या संख्येने केसेसमध्ये वाढ होतेय. मात्र रूग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणं दिसून येतायत. त्यामुळे सरसकट सर्वांना रूग्णालयात दाखल गरज नाही. यावेळी होमक्वारंटाईनवर भर दिला जाईल आणि ज्यात 9 ते 10 दिवस होम क्वारंटाईन गरजेचं आहे. मुख्य म्हणजे लक्षणांनुसार रूग्णाने उपचार घ्यावेत, असंही डॉ. ओक यांनी सांगितलंय.
डॉ. ओक पुढे म्हणाले, इंग्लंड अमेरिका आणि जर्मनीत आरोग्य व्यवस्था कोलमडण्याच्या अवस्थेत आली आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध राहायला पाहिजे. सध्या क्रॉस व्हॅक्सिनेशनचा विचार केंद्र करत नाहीये.
आजच्या बैठकीत कोरोनावर आळा कसा घालायचा, कमतरता कसलीही भासू नये तसंच सुरु असलेल्या गोष्टी कशा सुरु रहाव्यात याबाबत सरकार चर्चा होणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.