दररोजच्या सवयींमुळे होत आहेत हाडं कमकुवत; लवकरच बदला तुमच्या `या` सवयी
हाडं कमकुवत असतील तर शरीराला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं.
मुंबई : निरोगी आणि फीट शरीरासाठी हाडंही मजबूत असणं फार महत्त्वाचं असतं. जर तुमची हाडं कमकुवत असतील तर शरीराला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. आजकाल चुकीच्या लाईफस्टाईलमुळे हाडं कमकुवत होऊ लागली आहेत. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात लोकं त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. हाडांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास फ्रॅक्चर होण्याचा धोकाही बळावतो.
हाडांचं आरोग्य जपण्यासाठी चुकीच्या लाईफस्टाईलमधून काही सवयी बदलणं गरजेचं आहे. तर आज जाणून घेऊया कोणत्या सवयी सोडून देणं गरजेचं आहे.
बैठी जीवनशैली
ज्या व्यक्ती दिवसभर बसून असतात आणि व्यायाम करत नाहीत अशा व्यक्तींना हाडांसंबंधी समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असते. कारण मसल्सप्रमाणे हाडंही वर्कआऊट केल्याने मजबूत होतात. त्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनात वॉकिंग, जॉगिंग, व्यायाम, योगा यांचा समावेश करावा
तंबाखूचं सेवन सोडून द्यावं
तंबाखूचं सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये बोन डेन्सिटी कमी होत जाते. सिगारेट प्यायल्यामुळे फ्री रेडिकल्स वाढतात आणि हाडांच्या सेल्सना मारून टाकतं. त्याचप्रमाणे तंबाखूच्या सेवनाने असे हार्मोन्स रिलीज होतात जे हाडांना कमकुवत करतात.
अतिरीक्त मिठाचं सेवन टाळावं
जर तुम्ही जास्त मीठ घेत असाल तर तसं करणं थांबवा. कारण ते तुमच्या हाडांसाठी धोकादायक ठरू शकतं. जेव्हा शरीरात सोडियमचं प्रमाण वाढतं तेव्हा हाडांच्या डेन्सिटीमध्ये घट होऊ शकते, जे धोकादायक आहे.
पाण्याची कमतरता टाळा
निरोगी हाडांसाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी यांचा आहारात समावेश असणं अत्यंत आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आहारामध्ये व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमयुक्त पदार्थ खा. यासह जास्तीत जास्त पाणी प्या.