मुंबई : गेल्या वर्षापासून संपूर्ण देश कोरोनाशी लढा देतोय. दरम्यान आता कुठे कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसतेय. मात्र कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. कारण डेल्टा प्लस वेरिएंटचे रूग्ण वाढताना दिसतायत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन लावणार का असा प्रश्न मनात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना प्रतिबंधत लस ही वेरिएंटपासून संरक्षणाची हमी देत ​​नाही. म्हणूनच योग्य पद्धतीने मास्क घालणं खूप महत्वाचं आहे. वेरिएंट टाळण्यासाठी डबल मास्क लावणं अधिक प्रभावी आणि सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. डबल मास्क लावल्यामुळे रेस्पिरेटरी ड्रॉपलेटमध्ये असलेला व्हायरस कमी प्रमाणात पसरण्याची शक्यता असते. 


लस घेतल्यानंतर लोकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतो की मास्क लावावं की नाही. मात्र जरी तुम्ही लस घेतली असेल तरीही खाली दिलेल्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा. 


इनडोर सेटिंग


हवेतील विषाणूचे कण घरातील हवेशीर नसलेल्या ठिकाणी जमा होतात. ज्यामुळे कोरोना विषाणू पसरण्याचा धोका जास्त असतो. तर बाहेरची जागा कोरोना विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात मर्यादित असते. घरातील जागा अधिक संसर्गजन्य असते.


या व्यतिरिक्त, जर तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील ज्यांना लसीचा पूर्णपणे डोस मिळाले नसतील किंवा त्यांनी लस घेतली नसेल तर त्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. इनडोअर स्पेसमध्ये वेंटीलेशन आणि पुरेशी स्वच्छता यावर लक्ष दिलं पाहिजं.


कार्यक्रम


कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात जरी कमी झाला असेल तरीही सोशल डिस्टंसिंगचं पालन करणं आवश्यक आहे. त्यामुळे लग्नसंमारंभ, मिरवणुका, अंत्यसंस्कार किंवा इतर कोणत्याही तत्सम ठिकाणी जमणं टाळा. नेहमी मास्क घाला आणि लोकांच्या संपर्कापासून दूर रहा. यामुळे संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल.


किराणा दुकान आणि शॉपिंग


किराणा दुकान आणि खरेदीच्या ठिकाणी विषाणूचा धोका सर्वाधिक असतो. म्हणून, अशा ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. जर जाण्याची गरज असेल तर मास्क योग्यरित्या लावावा. दुकानांमध्ये असे लोकही असू शकतात ज्यांचं लसीकरण झालेलं नसेल. त्यामुळे तुम्हाला त्यांच्याकडून संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे योग्य अंतर ठेवा.


प्रवास आणि सार्वजनिक ठिकाणं


कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्यानंतर लोकांनी घराबाहेर प्रवास करण्यास सुरू केलं आहे. यादरम्यान लोकं सोशल डिस्टंसिंगचं पालन करत नाहीत. त्यामुळे जर तुम्ही घराबाहेर जात असाल तर नक्कीच मास्क घाला.