मुंबई : पावसाळ्यात अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात. कोविड-19 महामारीमुळे गेली 2 वर्ष लोकांचे खूपच हाल झाले. पण आता इतर फ्लू आणि रोग देखील पसरत आहेत. टोमॅटो ताप (Tomato fever) किंवा टोमॅटो फ्लू (Tomato flu) त्यापैकीच एक आहे. याची लागण झालेल्या रुग्णांमध्ये शरीरावर टोमॅटोसारखे फोड दिसतात. याचा परिणाम पाच वर्षाखालील मुलांवर होतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

11 मे 2022 रोजी केरळमध्ये पहिल्यांदा याची नोंद झाली. जो आता केरळच्या शेजारच्या राज्यांमध्येही पसरलाय. त्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे सुरुवातीची लक्षणं दिसल्यानंतर लगेचच यावर योग्य उपचार घेतले पाहिजे.


"टोमॅटो फ्लू" मुळे येणारे फोड सामान्यतः गोल आणि लाल रंगाचे असतात. जे टोमॅटोसारखे दिसतात. ज्या लोकांना याचा त्रास होतो त्यांना त्वचेची जळजळ, फोड, पुरळ आणि निर्जलीकरण होते. त्याचा कारक घटक चिकनगुनिया, विषाणूजन्य संसर्ग किंवा डेंग्यू तापाशी संबंधित आहे की नाही हे अद्याप निश्चितपणे समोर आलेले नाही.


टोमॅटो फ्लू हा आतड्यांतील विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य विषाणूजन्य आजार आहे. हा सहसा पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये दिसून येतो. टोमॅटो फ्लूने ग्रस्त असलेल्या मुलांना इतरांपासून लांब ठेवावे लागते कारण तो संसर्गजन्य आहे."


पण प्रौढ व्यक्ती देखील या रोगाला बळी पडतात. सामान्यतः, या रोगाचा धोका कमी असतो, परंतु काही प्रकरणांमध्ये, याचा परिणाम म्हणून मेंदुज्वर होऊ शकतो. म्हणून वेळेत उपचार घेणे आवश्यक आहे.


टोमॅटो फ्लूची लक्षणे


ताप, तोंडात वेदनादायक फोड येणे, हात, पायावर फोड येणे, थकवा, सांधेदुखी, पोटदुखी, मळमळ, उलट्या, जुलाब, खोकला, शिंका येणे, नाक वाहणे, खूप ताप आणि अंगदुखी. टोमॅटो फ्लूची काही लक्षणे आहेत. ते चिकुनगुनियाच्या लक्षणांसारखेच असतात.


या फ्लूचे मुख्य कारण अद्याप माहित नाही. त्यामुळे या फ्लूवर अद्याप कोणतेही विशिष्ट औषध किंवा उपचार उपलब्ध नाहीत. आत्मसंयमानेच तो बरा होऊ शकतो. जर मुलाची चांगली काळजी घेतली गेली तर लक्षणे वेळेवर निघून जातात.


टोमॅटो फ्लू असलेल्या मुलांनी थंड पाण्याने आंघोळ करावी. त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी आंघोळीनंतर त्वचेवर लोशन लावा. त्वचेवर खाजवणे टाळा, कारण यामुळे संसर्ग पसरू शकतो. हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे पाणी प्या. उकळलेले पाणी पिण्याची शिफारस केली जाते. लहान मुलांभोवती स्वच्छता राखावी. संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून अंतर ठेवावे. मसालेदार आणि खारट पदार्थ टाळा. दिवसभर पुरेशी विश्रांती घ्या. ताप कमी करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधोपचार करा.


हा संसर्ग टाळण्यासाठी उपाय:


मुलांनी टोमॅटो फ्लू असलेल्या लोकांशी संपर्क टाळावा. संक्रमित व्यक्तीने वापरलेली भांडी, कपडे आणि इतर वस्तू शेअर करणे टाळा. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चांगली स्वच्छता पाळली पाहिजे.


लक्षणे दिसल्यास काय करावे?


तुम्हाला तुमच्या मुलामध्ये यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास, डॉक्टरांचा सल्ला घ्या. मुलाला फोड, पुरळ किंवा इतर फोड खाजवू नयेत असे सांगा. त्यांना स्वच्छ ठेवा. या सर्वांव्यतिरिक्त, तुमचे मूल भरपूर पाणी पीत आहे याची खात्री करा.