मुंबई : जीम करताना मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी तुम्ही ऐकल्या असतील. पण जीममध्ये खुर्चीत बसलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं तुम्ही क्वचितच ऐकलं असेल. मात्र असा प्रकार खरंच घडलाय, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या ठिकाणी जिमच्या 38 वर्षीय ट्रेनरचा खुर्चीवर बसून मृत्यू झाला. तपासणीनंतर हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झालंचं डॉक्टरांनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाझियाबादच्या शालीमार गार्डनमध्ये ही घटना घडली. आदिल याठिकाणी जिम चालवायचा. दरम्यान या घटनेचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. व्हायरल होत असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आदिल जिमच्या ऑफिसमध्ये बसलेला दिसतोय. यावेळी आजूबाजूला इतर लोकही दिसतायत. यावेळी खुर्चीवर बसून आदिलला चक्कर आल्याचं दिसलं आणि यानंतर त्याच्या साथीदारांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केलं.


दिवसातून 4-5 तास व्यायाम करायचा


आदिलचा मित्र परागने सांगितलं की, त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. आदिलला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं. आदिलला पूर्वी कोणताही आजार नसून तो रोज 4 ते 5 तास वर्कआउट करायचा. 


दरम्यान याबाबत कुटुंबियांनी महत्त्वाची माहिती दिली की, आदिलला गेल्या 2-3 दिवसांपासून ताप होता. ताप असूनही त्याने जीम केलं. 


हृदयाचे ठोके अनियंत्रित


डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, ताप किंवा आजारी असल्यास व्यायाम करू नये. यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होतात. ताप किंवा आजारी असल्याने शरीर अशक्त होतं. परिणामी व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येण्याची धोका वाढतो.