थांबा! ओले केस सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करू नका...
केसांच्या नव-नव्या स्टाईल करण्यासाठी मुली केसांवर विविध कृत्रिम उपायांचा मारा करतात.
मुंबई : केसांच्या नव-नव्या स्टाईल करण्यासाठी मुली केसांवर विविध कृत्रिम उपायांचा मारा करतात. केस कर्ल्स, स्ट्रेट किंवा केसांना कलर करणं यासाठी अनेक उपकरणांचा वापर करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का? हे सर्व करताना वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमुळे केसांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं आणि केसांचं नुकसान होऊ शकतं.
केसांना वारंवार धुवून त्यांना हेअर ड्रायरच्या सहाय्याने सुकवणं, हेही तितकेच घातक आहे. फक्त पार्लरमध्येच नाही तर बऱ्याच वेळा मुली घरच्या घरी हेअर ड्रायरच्या सहाय्याने केस सुकवतात. यामुळे वेळ वाचतो, मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, असं केल्याने केसांची फार मोठ्या प्रमाणात हानी होते.
असं म्हणतात की, वारंवार केस धुवू नयेत. पण केस वारंवार धुण्यापेक्षा हेअर ड्रायरच्या मदतीने केस सुकवल्यास दहापटीने अधिक नुकसान असतं. हेअर ड्रायर, स्टेटनर किंवा हेअर आयर्निंग या उपकरणांचा वापर केल्याने केसांचं कधीही भरून न निघणारं नुकसान होतं. हेअर ड्रायर तसंच आयर्निंग सारख्या उपकरणांमधून येणारी गरम हवा केसांना नुकसानदायक असतं.
या तापमानामुळे केसांमधील पाण्याचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे केसाला हानी पोहोचू शकते. केसांवर एक विशिष्ट प्रकारचं आवरण असतं. ज्यातून केसांना मऊपणा आणि ओलावा मिळतो. हेअर ड्रायरच्या गरम हवेमुळे हा ओलावा कमी होत जातो. ज्यामुळे केस तुटतात किंवा केसांवर ताण येण्याची शक्यता असते. तसंच केस कोरडे पडतात आणि केसांना फाटे फुटतात. त्यामुळे अशा उपकरणांचा शक्यतो वापर करू नये. केसांना नैसर्गिकरित्या सुकवणेच उत्तम.
कशी घ्याल ओल्या केसांची काळजी
केस धुतल्यावर टॉवेलने हळूहळू पुसावेत.
ओल्या केसांवर जास्त काळ टॉवेल बांधून ठेवू नये.
ओले केस लगेचच विंचरू नये.
केस ओले असताना लगेच बांधू नये.