जेवल्यानंतर चूळ का भरावी? आई-आजीने लावलेली सवय आरोग्यासाठी आहे फायदेशीर
Benefits of Rinse Your Mouth: जेवण झाल्यानंतर दातांची निगा राखा असं आपले पूर्वज आपल्याला सांगायचे. मात्र, आजच्या धावपळीच्या युगात ही सवय मागे पडली आहे. मात्र, यामुळं अनेक आजार मागे लागू शकतात.
Benefits Of Rinse Your Mouth: जेवण झाल्यानंतर चूळ भरा, असा ओरडा कित्येकदा आपण ऐकला असेल. रात्रीचे किंवा दुपारचे जेवण झाल्यानंतर आई आणि आजी जबरदस्तीने चूळ भरयला सांगायचे. मात्र, आपण जसे जसे मोठे होतो तशा लहानपणीच्या सवयीही विसरत जातो. आपल्या पू्र्वजांनी लावलेली ही सवय खरंतर आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. या एका सवयीमुळं गंभीर आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
अनेक जण जेवण झाल्यानंतर फक्त पाणी पितात मात्र चूळ भरतच नाहीत. जेवण झाल्यानंतर तोंड साफ करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण याचा थेट संबंध तुमच्या आरोग्याशी निगडित आहे. जेवण झाल्यानंतर चूळ भरणे आणि दात साफ ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण ही एक सवय तुमचं मौखिक आरोग्य निरोगी ठेवू शकते. जाणून घ्या कसं ते?
दात खराब होण्याची भिती
तुम्ही एखादा पदार्थ खाल्ल्यास किंवा पेय पिल्ल्यास दाताला चिटकतात. तेव्हा दातावर बॅक्टेरियायुक्त प्लाक जमा होतात. प्लाकमुळं दात पिवळे होतात. त्याचबरोबर दाताच्यावर असलेले इनॅमल खराब होतात. एनॅमल आणि डेंटीन हे दोन्ही महत्वाचे भाग असून ते असंवेदनशील असतात. तर पल्प हा जो भाग आहे तो अति-संवेदनशील असतो.
दाताला किड लागते
जेवल्यानंतर चूळ भरणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही काळजी घेतली नाही तर दातांना किड लागण्याची शक्यता असते. जेवल्यानंतर बॅक्टेरिया दातांवर जमा होतात. त्यामुळं दातांना किड लागण्याची शक्यता असते. यात दात ठणकायला लागतो. यामुळं दात पूर्णपणे खराब होतात आणि दात आतमधून पूर्णपणे खराब होतात.
माउथ इन्फेक्शन होण्याची भीती
जर तुम्ही जेवल्यानंतर चूळ भरली नाही तर ओरल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. जेवण आणि त्यानंतर बॅक्टेरिया दातांच्यावर इन्फेक्शन निर्माण करतात. त्यामुळं तोंडावर चट्टे उठणे, जीभेवर फोड येणे यासारखे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून झोपण्याच्या आधी चूळ भरणे गरजेचे आहे. तसंच, तोडांतून दुर्गंधीही येत नाही.
जेवण झाल्यानंतर लगेचच 3 ते 5 मिनिटांनी चूळ भरा. तसंच, शक्य झाल्यास रात्रीही न विसरता ब्रश करा. दात घासल्यानंतर फ्लॉसने दातांमध्ये अडकलेले कण काढून टाका. मग पुन्हा दात स्वच्छ करा. यामुळे रात्रभर तुमच्या दातांचं रक्षण होईल.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)