अॅन्टीबायोटिक्स घेणं विसरल्यास काय होऊ शकतं ?
अॅन्टीबायोटीक्स न आवडण्याचे एक कारण म्हणजे अनेकांना त्यामुळे पोटात त्रास होतो.
मुंबई : अॅन्टीबायोटीक्स न आवडण्याचे एक कारण म्हणजे अनेकांना त्यामुळे पोटात त्रास होतो.
त्याच्या साईडइफेक्टच्या भीतीने अनेकजण अॅन्टीबायोटीक्सचा डोस विसरतात किंवा घेण्यास टाळाटाळ करणतात. पण असं करणं त्रासदायक ठरू शकते का ? याबाबतच्या खास सल्ला मुंबईतील फोर्टीस हॉस्पिटलचे एचओडी व जनरल मेडीसीन स्पेशलीस्ट डॉ.प्रदीप शाह यांनी दिला आहे.
आपण अॅन्टीबायोटीक्स का घेतो?
नॅचरोपॅथ व होलिस्टीक हेल्थकेअर प्रोफेशनल्स तुम्हाला अॅन्टीबायोटीक्स न घेण्याची हजारो कारणे सांगू शकतात.पण वस्तूस्थिती अशी असते की अॅन्टीबायोटीक्स वेळीच घेतल्याने तुमचा जीव वाचू शकतो त्यामुळे कधीकधी ही औषधे घेणे अत्यंत गरजेचे असते.जेव्हा तुमची फक्त रोगप्रतिकारशक्ती पुरेशी नसते तेव्हा इनफेक्शनवर उपचार करण्यासाठी ही अॅन्टीबायोटीक्स प्रभावी ठरतात. त्यामुळे अॅन्टीबायोटीक्स पुर्ण बंद करणे चुकीचे आहे.
पेनकिलर्स व Antihistamines अशी औषधे फार कमी वेळा घ्यावी लागतात.पण अॅन्टीबायोटीक्स तुम्हाला काही ठराविक दिवसांच्या कोर्ससाठी देण्यात येतात.जसे की कधीकधी तुम्हाला ती १० दिवस घ्यावी लागतात तर कधीकधी ५ दिवसच घ्यावी लागतात .डॉ.शाह यांच्यामते या काळात रुग्णांनी ती नियमित व वेळेत घ्यावी अशी डॉक्टरांना अपेक्षा असते.कारण असे न केल्यास रुग्णाच्या उपचारांमध्ये अडथळा येऊ शकतो.डॉक्टरांच्या मते अॅन्टीबायोटीक्स औषधांमुळे रोगासाठी कारणीभूत असणा-या रोगजनकांचा नाश केला जातो.पण जर रुग्णांने हे दोन डोस लागोपाठ घेतले नाहीत तर उपचारांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता असते.या काळात रोगाचे बॅक्टेरिया पुन्हा विकसित होऊ शकतात परिणामी तुम्ही पुन्हा आजारी पडू शकता. त्यामुळे आजारी पडल्यावर पुन्हा डॉक्टरकडे जाण्याआधी या गोष्टी नीट ध्यानात ठेवा.
अॅन्टीबायोटीक्सचा फक्त एकच डोस विसरल्याने काय होते ?
डॉ.शाह यांच्यामते जर तुम्ही काही कारणांमुळे अॅन्टीबायोटीक्सचा फक्त एकच डोस विसरला असाल तर काहीच हरकत नाही.कारण अशा वेळी तुमचे शरीर आधीच्या डोसमधील अॅन्टीबायोटीक प्रतिकार करण्यासाठी राखीव ठेवते.पण असे असले तरी डॉक्टर आवर्जून सांगतात की त्या पुढचा डोस मात्र तुम्ही लक्षात ठेऊन वेळेत घेणे गरजेचे अाहे.पण यासाठी डबल डोस घेण्याचा प्रयत्न करु नका.
अॅन्टीबायोटीक्स घेणे लक्षात ठेवण्यासाठी काय करावे?
वेळेवर अॅन्टीबायोटीक्स घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रिमांडर सेट करु शकता.तसेच डॉक्टर यासाठी तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध असलेल्या पिल ऑर्गनायझर विकत घेण्याचा देखील सल्ला देतात.हा एक प्लास्टीकचा छोटा डबा असून त्यामध्ये आठवड्याच्या रोजच्या गोळ्या ठेवण्यासाठी सात खण असतात.त्यानूसार तुम्हाला दररोज घ्याव्या लागणा-या गोळ्या त्यामध्ये ठेवा व त्या न विसरता दररोज घ्या.या युक्तीमुळे तुम्ही एकही डोस नक्कीच विसरणार नाही.