‘कोविड टोज’ म्हणजे काय?; जाणून घ्या लक्षणं
कोरोना तुमच्या त्वचेवरही परिणाम करू शकतो.
मुंबई : कोरोनाची लक्षणं म्हटलं की आपण खोकला, ताप, सर्दी आणि श्वास घेण्यास त्रास होणं या लक्षणांकडे पाहतो. मात्र तुम्ही कधी तुमच्या त्वचेवर याची लक्षणं पाहिलीत आहेत का? हो कारण कोरोना तुमच्या त्वचेवरही परिणाम करू शकतो. कोरोनामुळे 'कोविड टोज' ही समस्या उद्भवते.
कोविड टोज या समस्येला सोप्या शब्दांत मांडायचं झालं तर पायांच्या बोटांना होणारा अल्सर. या समस्येमध्ये रूग्णाच्या पायाच्या बोटांना सूज येऊ शकते.
‘कोविड टोज’ म्हणजे काय?
कोविड टोज म्हणजे पायांच्या बोटांना झालेली इजा, जखम किंवा येणारी सूज. कोविड टोजमध्ये पहिल्यांदा जखम लाल रंगाची असते. त्यानंतर ही जखम हळूहळू जांभळ्या रंगाची होऊ लागते. सुरुवातीला ही जखम पायाच्या एका बोटामध्ये दिसून येते. मात्र त्यानंतर हळूहळू बाकीच्या बोटांना जाणवू लागते.
‘कोविड टोज’ची लक्षणं
अनेकांना कोविडची टोजची लक्षणं दिसून येत नाहीत. ज्यावेळी ते पायाला निरखून पाहतात तेव्हा त्यांना कोविड टोजची माहिती होते. पायांना येणाऱ्या सूज व्यतिरीक्त बोटांना फोड येणं, खाज येणं त्याचप्रमाणे त्वचा कोरडी पडणं यांसारखे त्रास जाणवतात.
कोविड टोजवर उपचार
बहुतांश केसेसमध्ये ही समस्या आपोआपच बरी होते. मात्र तसं होत नसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. त्याचप्रमाणे बोटांना होणाऱ्या वेदना किंवा खाज कमी करण्यासाठी हायड्रोकोर्टिसोन क्रिम बाधित भागावर लावा.
कोविड टोजचा त्रास किती दिवस राहतो
तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, कोविड टोडचा त्रास 10 ते 14 दिवस राहू शकतो. तर काही रूग्णांना महिन्यांर्यंत हा त्रास सहन करावा लागतो.