`या` कारणांसाठी स्त्रियांना Maternity leave हवीच !
जर तुम्ही नोकरदार स्त्री असाल तर गरोदर राहिल्यावर तुमच्या मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे मॅटर्नीटी लिव्हचा.
मुंबई : जर तुम्ही नोकरदार स्त्री असाल तर गरोदर राहिल्यावर तुमच्या मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे मॅटर्नीटी लिव्हचा.
पुरेशी मॅटर्नीटी लिव्ह मिळणे महत्त्वाचे
बाळ झाल्यानंतर पुन्हा कामाला जाण्याची योग्य वेळ कोणती, याबाबत अनेक महिला साशंक असतात. कल्याणच्या फोर्टीज हॉस्पिटलचे Obstetrician and Gynecologist, डॉ. सुषमा तोमर यांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक मातेला पुरेशी सुट्टी (मॅटर्नीटी लिव्ह) मिळणे गरजेचे आहे. कारण ते आई आणि बाळ दोघांसाठी महत्त्वाचे आहे. पुरेशी मॅटर्नीटी लिव्ह मिळणे का महत्त्वाचे आहे, हे जाणून घेऊया.
बाळ झाल्यानंतर लगेचच कामावर जाणं आईला शारीरिक आणि मानसिक दोन्ही रित्या त्रासदायक ठरतं. डॉक्टरांच्या मते, कोणत्याही कॉम्प्लिकेशन्स शिवाय नॉर्मल प्रसूती झाली असल्यास आईने कमीत कमी ६ आठवडे आराम घेणे गरजेचे आहे. आणि सिझेरियन प्रसूती झाल्यास अधिक आरामाची गरज असते.
सुट्टीची गरज का ?
कारण प्रसूतीनंतर शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. त्यामुळे प्रसूतीनंतर स्त्रियांना नैराश्य येण्याची शक्यता १०-१५% असते. तसंच या हार्मोनल बदलांमुळे स्त्री मध्ये मूड स्वींग्स होतात. आनंदी असलेला मूड अचानक बदलतो आणि त्यांना उदास, डाऊन वाटू लागतं. म्हणून, कामाला पुन्हा सुरुवात करण्यापूर्वी नवमातेने घरी पुरेशी विश्रांती घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
आई आणि बाळाचे नाते अधिक घट्ट
त्याचबरोबर बाळ झाल्यावर लगेच कामाला सुरुवात करणाऱ्या मातेला काळजी, चिंता, नैराश्य यांना सामोरे जावे लागते. तसंच आरोग्याची हेळसांड होते. डॉ. सुषमा तोमर यांच्या सल्ल्यानुसार ज्या महिला प्रसूतीनंतर पुरेशी मॅटर्निटी लिव्ह घेऊन आराम करतात त्यांना मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता पुरेसा आराम न घेणाऱ्या आणि लगेचच कामाला सुरुवात करणाऱ्या महिलांच्या तुलनेत कमी असते. मॅटर्निटी लिव्हमुळे बाळाला स्तनपान करणे शक्य होते. जे बाळाच्या वाढी आणि विकासासाठी आवश्यक असते. त्याचबरोबर स्तनपान केल्याने आई आणि बाळाचे नाते अधिक घट्ट होते.