येत्या वर्षभरात कोरोनाची महामारी संपुष्टात येईल?
लसीचं उत्पादन वेगाने होत आहे आणि यामुळे या महामारीवर लवकरच मात केली जाईल.
दिल्ली : कोरोना कधी संपणार हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. दरम्यान सर्वांच्या मनातील या प्रश्नाचं उत्तर लस निर्माता कंपनी मॉडर्ना याचे सीईओ स्टीफन बॅन्सेल यांनी दिलं आहे. स्टीफन यांनी विश्वास व्यक्त केला आहे की, कोविड 19 महामारी पुढील एका वर्षात पूर्णपणे संपेल.
स्टीफन यांच्या सांगण्यानुसार, जागतिक मागणीनुसार, आता लसीचं उत्पादन वेगाने होत आहे आणि यामुळे या महामारीवर लवकरच मात केली जाईल. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, आतापर्यंत केवळ 2% लोकसंख्येला लसीचा डोस देण्यात आला आहे. म्हणून, जर आपण ग्राऊंड लेवलवर लसीकरणाबद्दल बोलायचं झालं तर स्टीफन बॅन्सेलचे हे विधान कमजोर मानलं जाईल.
मॉर्डेनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बॅन्सेल यांनी गुरुवारी स्विस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं "जगभरात लस उत्पादनात तेजी आली आहे. अशा प्रकारे, पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत ही लस संपूर्ण जगाच्या लोकसंख्येला उपलब्ध होईल." परिस्थिती कधी सामान्य होईल? या प्रश्नावर बॅन्सेल म्हणाले, "मला आशा आहे की वर्षभरात परिस्थिती सामान्य होईल."
लस न घेतलेल्या लोकांना धोका स्टीफन बॅन्सेल म्हणाले की, ज्यांना लस मिळेल ते येत्या काळात कोरोनाच्या या विषाणूपासून सुरक्षित राहतील. त्याच वेळी, ज्यांना ही लस मिळाली नाही, त्यांना डेल्टा प्रकारामुळे आजारी पडण्याचा किंवा रुग्णालयात दाखल होण्याचा धोका राहील.
बूस्टर शॉटची देखील आवश्यकता असू शकते
बॅन्सेल यांनी असंही सांगितलं की, येत्या काळात लोकांना लसीच्या बूस्टर डोसची आवश्यकता असू शकते. यासाठी उपलब्ध असलेल्या लसीच्या अर्ध्या डोसच्या फॉर्म्युलावर कंपनी काम करत आहे. त्याच वेळी, त्यांनी सांगितलं की, त्यांची कंपनी लसीच्या 'डेल्टा ऑप्टिमाइझ्ड व्हेरिएंट' वरही काम करत आहे. जे 2022 मध्ये बूस्टर शॉट्सचा आधार असेल.