हिवाळ्यात जसजसा गारठा वाढत जातो, तसतसे हृदयाची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. थंडी वाढायला लागली की रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासंबधित आव्हानं निर्माण होऊ लागतात. म्हणूनच हृदय सदृढ रहावं यासाठी योग्य ती काळजी घेणं आणि त्यासाठी आवश्यक चाचण्या करून घेणं महत्वाचे ठरतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईतील प्रयोगशाळेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजय शाह यांनी हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी कोणत्या चाचण्या कराव्यात याची माहिती दिली आहे. हिवाळा सुरू होण्याआधी हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी चाचण्या करून घेण्याचा विचार करा. यामध्ये रक्तदाब, कोलेस्ट्रॉल पातळीची तपासणी यासंबंधी चाचण्यांचा समावेश असतो. कोणते धोके आहेत हे लक्षात घेतल्याने तुमच्या हृदयाचे संभाव्य धोके कमी करण्यासाठी उपाययोजना ठरवता येतात.


रक्तदाबावर लक्ष ठेवणं


थंड हवामानाचा रक्तदाबावर परिणाम होऊन त्यात चढ-उतार आणि हृदयावरील ताण वाढू शकतो. घरी आणि डॉक्टरांच्या भेटी दरम्यान नियमित रक्तदाब तपासणी केल्याने तुमच्या हृदयावर पडणाऱ्या ताणाची कल्पना येते आणि उच्च रक्तदाब - हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांसाठी एक प्रमुख जोखीम घटक, व्यवस्थापित करण्यात मदत होते.


कोलेस्टेरॉल पातळीची चाचणी


हिवाळ्यात आहार बदल होतात आणि त्यामुळे कोलेस्टेरॉल पातळीवर परिणाम होऊ शकतो. उच्च कोलेस्टेरॉल हे हृदयविकाराचे महत्त्वपूर्ण कारण आहे. कोलेस्टेरॉलची नियमित तपासणी केल्याने आजारांचे वेळीच निदान होऊन योग्य उपाययोजना करणे, आणि निरोगी राहण्यासाठी जीवनशैलीमध्ये आवश्यक बदल किंवा औषधोपचार करणे शक्य होते.


मधुमेह तपासणी


मधुमेह आणि हृदयरोग सहसा एकत्र उद्भवतात. हिवाळ्यात असणारे सणवार आणि मेजवान्या मधुमेहाचा धोका वाढवतात आणि असल्यास त्रास वाढवतात. मधुमेह संबंधित तपासण्या नियमितपणे केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात मदत होऊन मधुमेहाशी संबंधित हृदयाचे आजार होण्याचा धोका कमी होतो.


ईसीजी (इलेक्ट्रोकार्डिओग्राम)


ईसीजीमध्ये हृदयाची इलेक्ट्रिकल अॅक्टीव्हिटी मोजली जाते आणि काही समस्या असल्यास लक्षात येऊ शकतात. हिवाळ्याचा ताण आणि हवेतील गारव्यामुळे हृदयाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. वेळोवेळी केलेल्या ईसीजी चाचणीमुळे तुमच्या हृदयाची लय आणि इलेक्ट्रिकल स्थिरतेबद्दल माहिती मिळते.


फ्लू लसीकरण


पारंपारिक चाचणी नसली तरी, फ्लूची लस घेणे हा एक महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे. इन्फ्लूएंझामुळे हृदयावर ताण येऊ शकतो, विशेषत: हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजार असलेल्यांसाठी. हिवाळ्यात फ्लूपासून स्वतःचे रक्षण करणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते.


वजन आणि बीएमआय वर लक्ष ठेवणे


योग्य वजन हा हृदयाच्या आरोग्यातील महत्वाचा घटक आहे. हिवाळ्यात बसून रहावेसे वाटते आणि आहार देखील वाढतो ज्यामुळे वजन वाढू शकते. वजन आणि बीएमआयवर नियमित लक्ष ठेवल्याने आहारात आणि व्यायामात वेळीच बदल करणे शक्य होते.