मुंबई : स्तनपान हे बाळ आणि आई दोघांसाठीही महत्त्वाचं मानलं जातं. स्तनपानामुळे नवजात बाळाला बऱ्याच प्रमाणात पोषक घटक मिळतात. शिवाय काही अभ्यासाच्या माध्यमातून असंही समोर आलं की, स्तनपान दिल्याने महिलांना प्रसूतीनंतर येणाऱ्या तणावात घट होते. अनेक महिलांच्या मनात स्तनपानाविषयी भीती असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शक्यतो नवीन मातांमध्ये या प्रकारची भिती निर्माण झालेली पाहायला मिळते. माझ्या बाळाला योग्य पद्धतीने स्तनपान देता येईल का? असा प्रकारची भिती त्यांना वाटत असते. महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले असतात.


बाळाला योग्य पद्धतीने दूध पाजता येईल का?


मातांच्या मनात पहिली भिती ही असते की मी माझ्या बाळाला योग्य पद्धतीने दूध पाजू शकेन का? बऱ्याच मातांना ही भीती सतावत असते. काही महिला या भितीने बाळाला दूध देणंही बंद करतात. ही भीती मनातून काढून टाकण्यासाठी डॉक्टरांकडून समुपदेशन घ्यावं. शिवाय दूध पाजतेवेळी बाळाला कसं धरावं याची माहिती करून घ्य़ावी. बाळाला जेव्हा भूक लागते तेव्हा बाळ रडतं. त्यामुळे मातेने बाळाचं रडणं ओळखणं गरजेचं आहे.


बाळाला पुरेसं दुधं मिळेल का?


नवीन  मातेला पहिल्याच दिवशी पुरेसं दूध नसतं. शिवाय अनेकवेळी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी देखली आई बाळाला पुरेसं दूध देऊ शकत नाही. अशा वेळी मातेने खचून जाऊ नये. हे जाणून घेणं गरजेचं आहे की पहिल्या काही दिवसांत मातेला पुरेसं दूध नसतं. शिवाय या दिवसांत बाळाला देखील फार कमी प्रमाणात दूधाची गरज असते.  


स्तनपानाने स्तनांचा आकार बदलण्याची भिती


अनेक महिलांना स्तनपान केल्याने स्तनांचा आकार बदलण्याची किंवा स्तन खाली येण्याची भिती असते. शिवाय अनेक महिलांना, याचा त्यांच्या लैंगिक जीवनावर देखील परिणाम होण्याची भिती मनात असते. मात्र एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की, स्तनपान केल्याने किंवा न केल्याने स्तनांचा आकार हा बदलतोच. यावर उपाय म्हणजे-


  • जीवनशैलीतील बदल

  • निरोगी आहार

  • बसण्याची योग्य स्थिती


स्तनपानामुळे वेदना होण्याची भिती


स्तनपानाबाबत महिलांमध्ये असणारी अजून एक भिती म्हणजे स्तनपान देतेवेळी होणाऱ्या वेदना. महिलांना असं वाटतं की, स्तनपान करतेवेळी कदाचित बाळ चावा घेईल, यामुळे स्तनाग्रातून रक्तस्राव होईल. मात्र एक जाणून घेणं गरजेचं आहे की, पहिल्यांदा स्तनपान करतेवेळी थोड्याफार प्रमाणात वेदना होणं स्वाभाविक आहे. यासाठी महिलांना समुपदेशनाची गरज असते.