World TB Day 2022: टीबीविषयीच्या `या` गैरसमजांना तुम्हीही खरं मानता का?
केंद्र सरकारची आकडेवारी पाहिली तर, नोव्हेंबर 2021 पर्यंत 19 लाखांपेक्षा अधिक टीबी रुग्णांची नोंद करण्यात आलीये.
मुंबई : आज 24 मार्च म्हणजेच जागतिक क्षयरोग दिन. देशातून टीबीचं पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारने 2025 हे लक्ष्य ठरवलं आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक स्तरावरून प्रयत्न केले जातायत. केंद्र सरकारची आकडेवारी पाहिली तर, नोव्हेंबर 2021 पर्यंत 19 लाखांपेक्षा अधिक टीबी रुग्णांची नोंद करण्यात आलीये.
Mycobacterium tuberculosis नावाच्या बॅक्टेरियामुळे टीबी म्हणजेच क्षयरोग हा संसर्गजन्य आजार होतो. हा बॅक्टेरिया शरीरातील कोणत्याही अवयवाला प्रभावित करू शकतो. मात्र अधिकतर टीबीची प्रकरणं ही फुफ्फुसांसदर्भाची असतात. WHOच्या माहितीनुसार, जगभरात दररोज 4100 रूग्ण टीबीमुळे आपला जीव गमावतात. तर 28,000 लोकं या आजाराच्या विळख्यात सापडतात.
टीबीला घातक मानलं जातं. मात्र याबाबत लोकांच्या मनात अनेक गैरसमजंही आहेत. तर आज वर्ल्ड टीबी दिनाच्या निमित्ताने आपण जाणून घेऊया टीबीसंदर्भात लोकांच्या मनात असलेल गैरसमज
लोकांना असं वाटतं की टीबीचा केवळ फुफ्फुसांवर परिणाम होतो, परंतु हे सत्य नाही. संपूर्ण जगभरात फुफ्फुसाच्या टीबीचे सुमारे 70 टक्के रुग्ण समोर येतात. परंतु हा आजार रक्ताद्वारे तुमच्या इतर अवयवांवरही परिणाम करू शकतो. जेव्हा त्याचा फुफ्फुसांवर परिणाम होतो तेव्हा त्याला पल्मोनरी टीबी म्हणतात आणि जेव्हा त्याचा इतर अवयवांवर परिणाम होतो तेव्हा त्याला एक्स्ट्रा पल्मोनरी टीबी असं म्हटलं जातं.
टीबी हा नेहमी संसर्गजन्य असतो, असा अनेकांचा समज असतो. मात्र हे खरं नाहीये. फक्त पल्मोनरी टीबी म्हणजेच फुफ्फुसाचा टीबी हा संसर्गजन्य असतो. त्याचे बॅक्टेरिया संक्रमित रुग्णाच्या खोकल्यामुळे किंवा शिंकताना हवेतून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करतात. परंतु शरीराच्या इतर भागांवर परिणाम करणारा एक्स्ट्रापल्मोनरी टीबी हा संसर्गजन्य नाही.
टीबीबाबत अजून एक प्रमुख गैरसमज म्हणजे, टीबी झाला म्हणजे व्यक्तीचा मृत्यू होतो. मात्र असं नाहीये. आजच्या काळात टीबीसाठी यशस्वी उपचारपद्धती उपलब्ध आहेत. जर योग्य पद्धतीने टीबीवर उपचार केले तर तो बरा देखील होऊ शकतो.