कशी ओळखाल दुधातील भेसळ?
भेसळयुक्त दूध ठरु शकतं हानिकारक...
मुबंई : वाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जाते, किंवा त्याच्या दर्जा कमी केला जातो. अनेकदा अशा भेसळयुक्त पदार्थांमुळे आपल्या शरीराला नुकसान होत असतं. गेल्या काही दिवसांपासून बाजारात विकलं जाणारं दूधही भेसळयुक्त असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्यासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. जवळपास दोन वर्षांपर्यंत सतत भेसळयुक्त, नकली दूध पिणाऱ्या लोकांना आतड्यांचे विकार, यकृत आणि किडनीसंबंधी रोग होण्याचा मोठा धोका असल्याचं अभ्यासकांनी म्हटलं आहे.
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात मोठा खुलासा केला आहे. भारतात विकलं जाणरं जवळपास १० टक्के दूध आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे. या १० टक्क्यांमध्ये ४० टक्के प्रमाण हे पिशवीबंद दूधाचं आहे. ज्याचा आपल्या दररोजच्या खाण्यात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
कसे ओळखाल भेसळयुक्त दूध
भेसळ नसलेलं दूध साठवल्यावरही रंग बदलत नाही. भेसळयुक्त दूधाचा रंग काही वेळानंतर बदलून तो पिवळा होतो.
भेसळ नसलेल्या दुधात यूरिया असल्यास ते हलक्या पिवळसर रंगाचं वाटतं. परंतु भेसळयुक्त दुधात यूरिया मिसळल्यास ते गडद पिवळ्या रंगाचं होतं.
भेसळ नसलेलं दूध हातांवर चोळल्यास चिकटपणा जाणवत नाही. तर भेसळ असलेलं दूध हातांवर चोळल्यास काही प्रमाणात साबणासारखा चिकटपणा जाणवतो.