काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर दगडफेक, एका तरुणाचा मृत्यू तर ७ जवान जखमी
काश्मीर खोऱ्यात झालेल्या दगडफेकीच्या घटना गेल्या अनेक दिवसांपासून थांबल्या होत्या. मात्र, रविवारी पुन्हा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली : काश्मीर खोऱ्यात झालेल्या दगडफेकीच्या घटना गेल्या अनेक दिवसांपासून थांबल्या होत्या. मात्र, रविवारी पुन्हा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे.
शोपिया जिल्ह्यातील गनौपुरा परिसरात गस्तीवर निघालेल्या सैन्य दलावर दगडफेक करण्यात आली आहे. इतकेच नाही तर ११ वाहनांची जाळपोळ करण्यात आली.
सैन्य दलाचे ७ जवान गंभीर जखमी
या दगडफेकीत सैन्य दलाच्या एका अधिकाऱ्यासोबत ७ जवान गंभीर जखमी झाले आहेत. आक्रमक झालेल्या जमावाकडून आपला बचाव करण्यासाठी सैन्य दलाला गोळीबार करावा लागला.
एका तरुणाचा मृत्यू
सैन्य दलाने केलेल्या या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी झाले आहेत.
दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ
सैन्य दलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, शोपियामधील गनौपुरामध्ये सैन्य दलाचं पथक गस्तीवर होतं. त्याच दरम्यान जमावाने दगडफेक करण्यास सुरुवात केली. १००-१२५ युवकांनी ही दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यानंतर ही संख्या २५० ते ३०० झाली आणि जमाव आणखीनच आक्रमक झाला.
चेहऱ्यावर कपडा बांधून असलेल्या या जमावाने सैन्य दलावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. बराचवेळ सैन्य दलाने आपला बचाव केला. मात्र, त्यानंतर जमावाने सैन्य दलाच्या ११ गाड्यांची जाळपोळ केली.
स्वसंरक्षणार्थ गोळीबार
जमावाने केलेल्या गोळीबारात सात जवान गंभीर जखमी झाले. त्यानंतर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. पण, जमाव आणखीनच आक्रमक झाला त्यानंतर सैन्य दलाने गोळीबार केला ज्यात एका तरुणाचा मृत्यू झाला.