गोव्यात काँग्रेसला मोठा झटका, १० आमदार भाजपात दाखल
काँग्रेसला गोव्यामध्ये भाजपने जोरदार दे धक्का दिला आहे.
पणजी : काँग्रेसने मध्य प्रदेशात कर्नाटकची पुनरावृत्ती होवू नये म्हणून काळजी घेतली असताना काँग्रेसला गोव्यामध्ये भाजपने जोरदार दे धक्का दिला आहे. १५ आमदारांपैकी १० आमदार आपल्या गळाला लावले आहे. हा काँग्रेसला हादरा आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असताना भाजपने सत्ता स्थापन केली. मात्र, महाराष्ट्राची पुनरावृत्त गोव्यात झालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते भाजपने फोडत त्यांना पक्षात घेतले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
भाजपने गोव्यात विरोधी पक्ष काँग्रेसची धार कमी केली आहे. गोव्यात आता भाजपचे अधिक स्थिर सरकार झाले आहे. काँग्रेस पक्षाच्या पंधरापैकी दहा आमदारांनी बुधवारी रात्री काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या दहा आमदारांनी आपण पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले. विरोधी पक्षनेते फुटण्याची गोव्याच्या राजकारणातील ही दुसरी घटना आहे.
दरम्यान, १५ पैकी १० आमदार फुटल्याने त्यांच्यावर पक्षांतर्गत कायद्यानुसार कारवाई होणार नाही. कारण दोनतृतीयांश आमदार फुटल्याने आमदारकीचा राजीनामा द्यावा लागत नाही किंवा पोटनिवडणुकीलाही सामोरे जावे लागत नाही. दहा आमदारांमध्ये कवळेकर यांच्यासह नीळकंठ हळर्णकर, इजिदोर फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, बाबूश मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा ऊर्फ बाबाशान, जेनिफर मोन्सेरात, क्लाफास डायस यांचा समावेश आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, लुईझीन फालेरो, रवी नाईक, दिगंबर कामत आणि आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे नेते आता काँग्रेसमध्ये राहिले आहेत. भाजपचे गोवा प्रभारी बी. एल. संतोष हे गेले दोन दिवस गोव्यात आहेत. त्यानंतर राजकीय हलचालींना वेग आला. दरम्यान, काँग्रेसच्या आमदारांपैकी काही जणांना मंत्रीपदे देण्यासाठी विद्यमान मंत्र्यांपैकी काही जणांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.