आसामच्या सिलचर येथे भाजपा खासदार राजदीप रॉय यांच्या निवासस्थानी 10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. कछारचे एसएसपी सुब्रत सेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाच्या गळ्याभोवती कपडा गुंडाळलेला होता. तसंच हा मुलगा खासदाराच्या घऱात घरकाम करणाऱ्या महिलेचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. गेल्या अडीच वर्षांपासून महिला खासदाराच्या घरात काम करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाची आई धोलाई परिसरात राहणारी आहे. भाजपा खासदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना आपल्या घऱात धक्कादायक घटना घडल्याची माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं आहे की, त्यांच्या घऱात लटकलेल्या अवस्थेत एका मुलाचा मृतदेह आढळला होता. यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. 


मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह सिलचर मेडिकल कॉलेजला पाठवला आहे. राजदीप रॉय यांनी सांगितलं आहे "घरात एक आपातकालीन घटना घडल्याची माहिती मला मिळाल्यानंतर मी पुन्हा घरी गेलो होतो. घरी गेल्यानंतर मला माहिती मिळाली की, माझ्या घरात एक कुटुंब होतं. ते काम करणारे होते आणि त्यांना दोन मुलं आहेत. मुलगा पाचवीत शिकत असून, मुलगी आठवीत शिकतो. काही वेळाने मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं. आम्ही तात्काळ पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. मुलाला रुग्णालयात नेण्यात आलं. दुर्दैवाने त्याला मृत घोषित करण्यात आलं".



प्रोटोकॉल अंतर्गत होणार चौकशी


भाजपा खासदाराने सांगितलं आहे की, सिलचर पोलीस अधिक्षकांशी माझं बोलणं झालं असून हे कथितपणे आत्महत्या प्रकरण असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. घटना घडली तेव्हा मी कार्यालयात होतो अशी माहिती त्यांनी दिली आहे. पोलीस नियमाप्रमाणे चौकशी करणार असल्याचं राजदीप रॉय यांनी सांगितलं आहे. 


मुलाने आईकडे मागितला होता मोबाईल


भाजपा नेत्याने सांगितलं आहे की "पीडित कुटुंब पहिल्या माळ्यावर राहतं. लहान मुलगा फार चांगला होता आणि मी त्याला शाळेत दाखल केलं होतं. त्याची आई एक जबाबदार पालक आहे. महिलेने सांगितल्यानुसार, त्यांनी एकत्र जेवण केलं होतं. यानंत जेव्हा आई आणि मुलगी जात होती तेव्हा मुलाने आईकडे मोबाईल मागितला होता. अर्ध्या तासाने जेव्हा ते परतले तेव्हा दरवाजा आतून बंद होता".