कोटामध्ये महिन्याभरात १०० अर्भकांचा मृत्यू, नेत्यांकडून मात्र राजकारण
एका महिन्यामध्ये १०० अर्भकांचा मृत्यू
हिमांशू मित्तल, झी मीडिया, कोटा : एका महिन्यामध्ये १०० अर्भकांचा मृत्यू झाला असताना देशातले दोन प्रमुख पक्ष मात्र राजकारणात गुंतले आहेत. रुग्णालयाच्या दुरावस्थेला आधीचं सरकारच जबाबदार असल्याचा आरोग्यमंत्र्यांचा दावा आहे. राजस्थानच्या कोटामध्ये बालमृत्यू थांबण्याची चिन्हं नाहीत. आजही तिथल्या सरकारी रुग्णालयात आणखी एका बाळाचा मृत्यू झाला. एकट्या डिसेंबरमध्ये शंभर नवजात अर्भकांना आपला प्राण गमवावं लागल्यानंतरही हे सत्र सुरूच आहे. रुग्णालयाची स्थिती इतकी वाईट आहे की हे रुग्णालय आहे की कोंडवाडा असा प्रश्न पडला आहे.
राजस्थानच्या कोटामधल्या जे के लोन सरकारी रुग्णालयाचा शिशूरुग्ण विभागात वाईट परिस्थिती आहे. रुग्णालयाच्या बाहेरचा परिसरही अतिशय वाईट आहे. डुक्करं मुक्तसंचार करत आहेत. ठिकठिकाणी पाण्याची डबकी साचली आहेत. त्यामध्ये रोग पसरवणाऱ्या डासांची पैदास होते आहे. रुग्णालयातील स्थिती तर आणखी वाईट आहे. पाणी झिरपत असलेल्या ओल्या भिंती, गळकी छप्परं, उंदरांचा मुक्तसंचार इथं सुरू असतो. नुकताच जन्माला आलेल्या बाळांना अशा स्थितीत ठेवलं जातं आहे.
रुग्णालयामध्ये सोयीसुविधांचाही प्रचंड आभाव आहे. १९ पैकी ११ व्हेंटिलेटर बंद आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा आहे. वॉर्मर्सची संख्या एवढी अपुरी आहे की एकेका वॉर्मरमध्ये दोन-दोन तीन-तीन बाळांना ठेवावं लागतं आहे. कडाक्याच्या थंडीत नुकत्याच जन्मलेल्या या निरागस जीवांचे अतोनात हाल होत आहेत. रुग्णालय प्रशासन मात्र गोलमोल उत्तरं देण्यात समाधान मानतं आहे.
राजस्थानचे आरोग्यमंत्री गेल्या वर्षीपेक्षा बालमृत्यूंचं प्रमाण घटल्याचं सांगत स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत. गेल्यावर्षीच्या आकड्यांशी तुलना करण्यापेक्षा रुग्णालयाची स्थिती सुधारण्याकडे लक्ष दिलं तर जास्त बरं होईल, असं राजकारण्यांना का वाटत नाही. तुमच्या अकार्यक्षमतेची शिक्षा जगात नुकतंच पाऊल ठेवलेल्या या चिमुरड्यांना का दिली जात आहे असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.