निलेश खरमारे, झी मीडिया, अमृतसर : जगातलं सगळ्यात मोठं हत्याकांड असं ज्याचं वर्णन करता येईल, ते हत्याकांड आजच्याच दिवशी घडलं. आता त्याला शंभर वर्षं पूर्ण होतील. इतिहासातली ही घटना आजही अंगावर काटा आणते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास शंभर वर्षांपूर्वीच्या याच किंकाळ्या आजही अंगावर शहारे आणणाऱ्या... 13 एप्रिल 1919 चा तो दिवस... पंजाबमधल्या अमृतसरमधल्या याच जालियानवाला बाग मैदानात बैसाखीसाठी लोक जमायला लागले होते... इंग्रजांविरोधात एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं... सात एकरांच्या परिसरात वीस हजार लोक एकत्र जमले होते... इंग्रजांविरोधातली ही सभा दडपण्यासाठी जनरल डायर तिथे पोहोचला... आणि लष्करी तुकडीला गोळीबाराचा आदेश दिला.


अनेक रायफलींमधून 1,650 राउंड झाडले गेले... गोळ्यांनी किती जणांचे प्राण टिपले याची गणतीच नाही... गेट बंद करण्यात आलं... जीव वाचवण्यासाठी लोकांनी विहीरीत उड्या मारल्या... अनेकांनी भिंत चढून जाण्याचा प्रयत्न केला... त्यांचा गोळ्यांनी पाठलाग केला... बैलाखीच्या दिवशी रक्ताचा सडा जालियानवाला बागेत पडला...


आजही त्या अरुंद आणि एकमेव मार्गावर चालताना अंगावर काटा येतो. शंभर वर्षांपूर्वी रक्तानं भरलेली ही विहीर आता कोरडी आहे... त्या दिवशी 120 जणांचे मृतदेह या विहीरीत मिळाले... भिंतीवर लागलेल्या गोळ्यांच्या खुणा आजही तशाच आहेत.


भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली 'सर' ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारक जन्माला आले... भगतसिंग हा त्यातूनच पेटून उठलेला क्रांतीकारी... जवळपास दोन दशकांच्या प्रतिक्षीनंतर 13 मार्च 1940 ला हुतात्मा उधमसिंहानं इंग्लंडमध्ये जाऊन नराधम डायरला कंठस्नान घातलं... एक बदला पूर्ण झाला.


आजही जालियानवाला बाग जनरल डायरच्या गोळ्यांच्या खुणा अंगावर वावगत उभी आहे... त्या रक्तरंजित इतिहासाची साक्ष देत...