4 आठवडे YouTube वरुन ट्रेनिंग घेतले, नंतर आपल्याच वर्गमित्राला संपवले, कारण ऐकून पोलिसही सुन्न
Crime News In Marathi: एका विद्यार्थ्याने त्याच्याच वर्गातील एका मुलाचा जीव घेतला आहे. इतकंच नव्हे तर जीव घेण्यासाठी त्यांने युट्यूबचा आधार घेतला होता.
Crime News In Marathi Today: दहावीतील विद्यार्थ्यांच्या कृत्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. एकाच वर्गातील दोन विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादातून एक भयंकर घटना घडली आहे. या मुळं शाळेतही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका क्षुल्लक कारणावरुन एका दहावीच्या विद्यार्थ्यांने त्याचाच वर्गातील मुलाची हत्या केली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता मुलाने हत्या करण्याची पद्धत सांगितल्यावर तेदेखील चक्रावले आहेत.
कानपूरच्या प्रयाग विद्या मंदिरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांने वर्गातच त्याच्या वर्गमित्राच्या गळ्यावर चाकुने वार केले आहेत. दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद सुरु होते. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेली माहिती अशी की, दोन्ही विद्यार्थ्यांचे बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीवर प्रेम होते. आरोपी विद्यार्थी तिच्याशी बोलत असे, मात्र ते पीडीत विद्यार्थ्याला पसंत नव्हेत. यावरुन दोघांमध्ये वाद होते. अनेकदा त्यांच्यात भांडणे ही झाली होती. ज्यादिवशी विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली त्याचदिवशी पीडित विद्यार्थी त्याच्या मित्रांसोबत आरोपी विद्यार्थ्यावर हल्ला करणार होता. त्यामुळं त्याआधीच आरोपीने विद्यार्थ्यांची चाकूने वार करत हत्या केली.
पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची अधिक चौकशी केली त्यावेळी त्याने हत्येचा कट कसा रचला हे उघड केले आहे. वर्गमित्राची हत्या करण्यासाठी त्याने जवळपास ४ आठवडे युट्यूबचे व्हिडिओ पाहिले. यात एखाद्या व्यक्तीचा जीव कसा घ्यावे, हे शिकवण्यात आले होते. त्यानुसारच त्याने हत्येचा कट रचला व विद्यार्थ्याची हत्या केली. युट्यूबचे व्हिडिओ पाहण्यासाठी त्याने त्याच्या नातेवाईकांचा फोन वापरला होता.
एखाद्याचा जीव घेण्यासाठी त्याच्या गळ्यावर वार करणे ही प्रभावी पद्धत आहे, असं या विद्यार्थ्याने पोलिसांना सांगितले. विद्यार्थ्याने युटयुब व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच त्याच्या वर्गमित्राची हत्या केली आहे. शवविच्छेदन अहवालातही पीडित तरुणाच्या गळ्यावर, खांद्यावर ६ वार होते. ज्यात श्वासनलिकेवर पाच इंचाची खोल जखम आहे. असं समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोजच्या भांडणाला कंटाळून आरोपीने हे पाऊल उचलले आहे. तो कोणते व्हिडिओ पाहत होता, याची चौकशी करण्यात येत आहे. तसंच, त्याने कोणत्या साइट्सवर क्लिक केले, हेदेखील तपासण्यात येणार आहे.
पीडित मुलगा आणि त्याचे मित्र सोमवारी शाळा सुटल्यानंतर त्याच्यावर हल्ला करण्याचा प्लान करत होते. त्यामुळं मला भीती वाटत होती. ते मला मारुन टाकतील अशी भीती होती. मी त्याच्या गर्लफ्रेंडशी बोलायचो म्हणून तो शिवीगाळ करायचा. सोमवारीही त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. जर मी त्याला मारले नसते तर त्याने माझा जीव घेतला असता, असा दावा आरोपीने केला आहे.