हैदराबाद : विद्यार्थ्यांनी एखादी चुक वारंवार करु नये यासाठी शिक्षक छोटीशी शिक्षा करतात. पण शाळेचा गणवेश घातला नाही ही चुक मानून ११ वर्षांच्या विद्यार्थिनीला  मुलांच्या प्रसाधानगृहात उभं राहण्याची शिक्षा केल्याची भयंकर घटना हैदराबाद येथे घडली. आहे. ही घटना समजताच शिक्षिकेवर तात्काळ आणि कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बालहक्क संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शाळेचा गणवेश धुवायला टाकलेला गणवेश वाळला नसल्याने विद्यार्थिनी साध्या कपड्यांमध्ये शाळेत उपस्थित राहिली. तसेच तिने आपल्या पालकांकडून गणवेश न घातल्याबद्दलचे कारण दैनंदिनीत लिहून घेतले होते आणि शाळेत गेल्यावर ते शिक्षिकेला दाखवले देखील होते. पण शिक्षिका मात्र ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. मुलीने शिक्षिकेला समजवण्याचा प्रयत्न केला. पण विद्यार्थिनीचे न ऐकता मुलांच्या प्रसाधनगृहात उभं राहण्याची शिक्षा देण्यात आली. 


पालकांची तक्रार 


या प्रकारमुळे विद्यार्थिनी घाबरली असून आपल्याला पुन्हा शाळेत जायचे नाही, असा आग्रह पालकांकडे धरत आहे. 
या घटनेनंतर पीडितेच्या पालकांनी शाळा आणि शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली असून कारवाईची मागणी केली आहे. बालहक्क संघटनांनी देखील त्यांना पाठिंबा दिला आहे.