या १३,५०० सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी होणार
१३,५०० सरकारी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नवी दिल्ली : न सांगता सुट्टी घेणाऱ्या १३,५०० कर्मचाऱ्यांची भारतीय रेल्वे हकालपट्टी करणार आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता सुट्टीवर गेलेल्या या १३,५०० कर्मचाऱ्यांची माहिती रेल्वेला मिळाली आहे. या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंग केल्यामुळे कारवाई करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना अशा कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करायला सांगितली होती.
कर्मचाऱ्यांची नावं हटवण्याचे आदेश
कारवाई करण्यात आलेल्या १३,५०० कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमानुसार समाप्त करण्यात येणार आहेत. तसंच ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांची नाव रेल्वेच्या यादीतून हटवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना पूर्वसूचना न देता सुट्टीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसंच ग्रुप सी आणि ग्रुप डीमधल्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, असं रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं होतं. निष्ठेनं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी रेल्वेनं अभियानाला सुरुवात केली आहे. ही कारवाई याच अभियानाचा भाग आहे.