रांची: झारखंड राज्यातील चतरा जिल्ह्यातून मानवतेला काळीमा फासणारी घटना पुढे येत आहे. येथील पाच नराधमांनी १६ वर्षीय मुलीवर पळवून नेऊन सामुहिक बलात्कार केला. नराधमांच्या क्रूरतेने इतका टोकाचा कळस गाठला की, त्यांनी पीडित मुलीला तिच्या कुटुंबियांसमोर जिवंत जाळले. त्यानंतर त्यांनी पीडितेच्या कुटुंबियांनाही मारहाण केली. बलात्काराच्या घटनेनंतर गावपंचायतीने आरोपींना १०० बैठका काढायला लावल्या तसेच, आर्थिक दंड केला. त्यामुळे संतापलेल्या नराधमांनी पीडितेला जाळले व तिच्या कुटुंबियांना मारहाण केल्याचे समजते. दरम्यान, एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना दिली.


आरोपी अद्याप फरार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंड राज्यातील चतरा जिल्ह्यात तेंदुआ नावाचे गाव आहे. या गावात ही घटना शुक्रवारी (४ मे) घडली. पीडित मुलगी ही एका नातेवाईकाच्या विवाहात सहभागी होण्यासाठी आली होती. दरम्यान, लिंगपिसाट आरोपींनी तिला जबरदस्तीने पळवून जंगलात नेले आणि तेथे तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. या प्रकरणातील एकूण पाच आरोपींपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, इतर चार जण अद्याप फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत.


तपासासाठी स्वतंत्र पोलीस पथक तैनात


दरम्यान, पोलीस अधिकारी आशीष बत्रा यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन डीएसपींच्या टीमला पाठवण्यात आले आहे. तसेच, एसपींनाही परिसरातील कायदा व सुव्यवस्थेवर बारिक लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांचे एक स्वतंत्र पथक नेमण्यात आले आहे. तसेच, राज्याच्या गृहमंत्रालयानेही पोलिसांना घटनेबाबतचा अहवाल मागवला आहे. 


स्थानिक पातळीवर प्रकरण मिटवण्याचा गावकऱ्यांचा प्रयत्न


दरम्यान, बात्रा यांनी पुढे सांगितले की, हे प्रकरण पोलिसांकडे न देता गावकऱ्यांनी गावपंचायतीच्या माध्यमातून स्थानिक स्तरावरच मिटविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी आरोपींना दोषी ठरवत ५० हजार रूपये दंड आणि १०० बैठकांची शिक्षा देण्यात आली. मात्र, गावकऱ्यांच्या या निर्णयाला पीडितेच्या कुटुंबियांनी आक्षेप घेतला. त्यानंतर आरोपी आणि पीडितेच्या कुटुंबियांमध्ये भांडण सुरू झाले. आरोपींनी पीडितेच्या कुटुंबियांना मारहाण केली. त्यानंतर पीडितेच्या घरी जाऊन तिला जिवंत जाळले. पीडितेच्या आईने नराधमांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांनी तिहाही मारहाण केली. यात पीडितेच्या आईच्या हाताचे हाड तुटले. त्यानंतर आरोपी पसार झाले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.