बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये 170 दहशतवादी ठार, इटलीच्या पत्रकाराचा दावा
भारतीय वायु सेनेने बालाकोट येथे केलेल्या हल्ल्यात 130 ते 170 दहशतवादी मारले गेल्याचा दावा विदेशी पत्रकाराने केला आहे.
नवी दिल्ली : भारतीय वायु सेनेने बालाकोट येथे केलेल्या हल्ल्यात 130 ते 170 दहशतवादी मारले गेल्याचा दावा विदेशी पत्रकाराने केला आहे. यामुळे बालाकोट मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पुलवामा हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतातर्फे बालाकोट येथील दहशतवादी तळावर एअर स्ट्राईक करण्यात आले होते. या हल्ल्यात किती दहशतवाद्यांचा खात्मा झाला यासंदर्भातील माहिती गुपित ठेवण्यात आली. दरम्यान या ठिकाणी जिवीतहानी झालीच नसल्याचा दावा पाकिस्तान सरकारने केला. हल्ल्यानंतर बालाकोट येथे जाण्यास मज्जाव करणाऱ्या पाकिस्तान सरकारने 2 महिन्यांनी जगातील पत्रकारांना तिथे आमंत्रित केले होते. या ठिकाणच्या जागेचेच केवळ नुकसान झाल्याचे पाकिस्तान सरकारने सांगितले. तसेच या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले यासंदर्भातील माहिती विरोधकांनी देखील मागितली. यावरून राजकारण चांगलेच तापले.
इटलीतील पत्रकार फ्रांसेस मारिनो यांनी स्थानिक सुत्रांच्या मदतीने स्ट्रिंगरएशियावर बालाकोट हल्ल्या संदर्भात माहिती लिहीली आहे. भारतीय वायुसेनेने पहाटे 3.30 वाजता हल्ला चढवला आणि पाकिस्तानी सैन्य घटनास्थळी अडीत तासानंतर पोहोचले. पाकिस्तानी सैन्य घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी जखमी तसेच ठार झालेल्या दहशतवाद्यांना शिंकियारी येथील हरकत उल मुजाहिदीनच्या तळावर नेले. याठिकाणी जखमींवर उपचार करण्यात आले.
हल्ल्यात आणि उपचारा दरम्यान ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या 130 ते 170 च्या घरात असल्याचेही मारिनो यांनी सांगितले. या ठिकाणी आजही 45 जणांवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले. मृतांच्या नातेवाईकांनी याप्रकरणी माध्यमांशी काही बोलू नये म्हणून जैश ए मोहम्मदच्या लोकांनी पैसे देऊन त्यांचे तोंड बंद केले. वेळ आल्यावर याचा बदला घेतला जाईल असे जैश ए मोहम्मद संघटनेने म्हटल्याचा दावा देखील मारिनो यांनी केला आहे.
(हा दावा इटलीतील पत्रकार फ्रांसेस मारिनो यांचा असून 24taas.com याची पुष्टी करत नाही)