मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना महाराष्ट्र राज्य सरकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाकडून (ईडी) गुन्हा दाखल करण्यात आलाय. यानंतर, भाजप सरकारवर टीका होतेय. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अगोदर विरोधी नेते असलेल्या पवारांना भाजप सरकारकडून टार्गेट केलं जातंय, अशी टीका केली जातेय. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही पवारांना पाठिंबा देत आपली प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी ट्विट केलंय. 'शरद पवार हे विरोधी पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत, हे सूडानं पेटलेलं सरकार पवारांना लक्ष्य करत आहेत. महाराष्ट्रातील निवडणुका एक महिन्यावर आल्या असताना सत्ताधारी हे संधीसाधू राजकारण करतयं' असं राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. 


राहुल गांधी यांचं ट्विट

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीही भाजपाकडून ईडीचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केलाय. दरम्यान, ईडी कार्यालयाने नोटीस पाठवल्यानंतर आज शरद पवार ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. दुपारी दीड वाजता ते घरातून बाहेर पडणार असून ईडी कार्यालयात हजर राहणार आहे. पवारांच्या या ऑफिस भेटीच्या पार्श्वभूमीवर त्या परिसरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. पवारांच्या ईडी भेटीसंदर्भात दिल्लीत बैठक झाली. परिस्थिती चिघळली तर सीआरपीएफ जवानांना तैनात राहण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच पोलीस बंदोबस्त वाढवण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात.



महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून पवारांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहे. कार्यकर्त्यांनी आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी ठाण्यातील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बंदोबस्त लावलाय. त्यामुळे ठाण्यातून मुंबईला जाणाऱ्या आनंद नगर चेक नाका इथं वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.