२ वर्षापर्यंतच्या एफडीवर या २ बँका देतात सर्वाधिक व्याज
कोणती बँक देते एफडीवर सर्वाधिक फायदा
मुंबई : जर तुम्ही पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर कोणती बँक सर्वाधिक व्याज देते याची माहिती तुम्हाला असायला हवी. जर तुम्ही एफडीमध्ये पैसे गुंतवणूक करत असाल तर काही बँक १ वर्षापर्यंतच्या एफडीवर ७ ते ८ टक्के व्याज देतात. FD यासाठी महत्त्वाची असते जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असेल तेव्हा तुम्ही ती काढू शकता.
२ बँका देतात सर्वाधिक व्याज
जर तुम्ही सव्वा वर्ष ते २ वर्षापर्यंत एफडी करता तर परदेशी बँक दॉयचे बँक आणि खासगी क्षेत्रातील इंडसइंड बँक तुम्हाला सर्वाधिक व्याज देते. सध्या या दोन्ही बँका तुम्हाला या एफडीवर ८ टक्के व्याज देतात. या दोन्ही बँकांमध्ये १ कोटीपर्यंतची एफडी करु शकता. वरिष्ठ नागरिकांसाठी इंडसइंड बँक ८.३५ टक्के व्याज देते. तर बंधन को-ऑपरेटिव बँक १८ महिने ते २ वर्षाच्या एफडीवर वरिष्ठ नागरिकांना ८.१५ टक्के व्याज देते. तर सामान्य नागरिकांना ७.६५ टक्के व्याज देते.
१५ लाखापेक्षा अधिकच्या एफडीवर फायदा
जर तुम्ही मोठी रक्कम गुंतवू इच्छित असाल आणि दीड वर्षाच्या खाली तुम्हाला एफडी करायची असेल तर इंडसइंड बँक तुम्हाला १ वर्षापेक्षा अधिक आणि १ वर्ष २ महिने पेक्षा कमीच्या एफडीवर ८.२५ टक्के व्याज देत आहे. त्यानंतर दॉयचे बँक ८ टक्के, बंधन को-ऑपरेटिव बँक ७.६५ टक्के आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँक ७.५० टक्के व्याज देत आहे.
किती मिळणार व्याज?
जर तुम्ही एफडी करताना तुम्हाला बँकेने ८ टक्के व्याज ऑफर केलं आणि तुम्ही १५ लाख रुपयांची एफडी केली तर व्याज तिमाही वाढत जातं. जर तुमची FD एका वर्षात मॅच्योर होते तर तुम्हाला १६,२३,६४८ रुपये मिळतील. पण यावर तुम्हाला टॅक्स देखील भरावा लागू शकतो.