बंगळुरू : कर्नाटकमध्ये सध्या राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. मंगळवारी अपक्ष आमदार एच नागेश आणि केपीजेपीचे आमदार आर शंकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या जेडीएस-काँग्रेस सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. विधानसभेच्या २२४ जागांपैकी भाजपचे १०४, काँग्रेसचे ८० तर जेडीएसचे ३७ आमदार आहेत. बसपा, केपीजेपी आणि अपक्ष असे प्रत्येकी एक आमदार आहे.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकात पुन्हा एकदा सत्तासंघर्ष शिगेला पोहचलाय. संक्रातीच्या मुहुर्तावर कर्नाटकातल्या आघाडी सरकारवर संक्रांत येण्याची शक्यता आहे. भाजपानं जेडीएस-काँग्रेसचं आघाडी सरकार पाडण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा भाजपा नेत्यांनी केलाय. काँग्रेसचे तीन आमदार मुंबईतल्या रेनिसन्स हॉटेलमध्ये असल्याचं उघड झालंय. त्यामुळे या सत्ता संघर्षाच्या चर्चेला आणखीनच ऊत आलाय. तसंच भाजपाच्या सर्व आमदारांना गुरूग्राममध्ये ठेवण्यात आलंय. तर आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचा दावा मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी केलाय. 


भाजपा सत्तेसाठी आघाडीच्या आमदारांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र एकही आमदार फु़टणार नसल्याचा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी व्यक्त केलाय. तसंच काँग्रेसचा एकही आमदार भाजपाच्या संपर्कात नसल्याचा दावा काँग्रेसचे जलसिंचन मंत्री डी. के. शिवकमुार यांनी केलाय. 


कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यांत राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झालीय. भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'मध्ये कर्नाटकातलं सरकार पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. भाजपनं आपल्या १४ आमदारांना गुरुग्रामच्या एका हॉटेलमध्ये ठेवल्याचंही समजतंय.


राज्यातील २२४ जागांपैंकी भाजपकडे १०४, काँग्रेस ८०, जेडीएस ३७, बीएसपी - १, केपीजेपी १ आणि अपक्षकडे १ जागा आहे. काँग्रेसनं जेडीएससोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं होतं.