भंडारा प्रकरण : पंतप्रधान निधीतून पीडित कुटुंबांना 2 लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत
भंडारा दुर्घटने प्रकरणी फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात एकच खळबळ माजली आहे.
भंडारा : भंडारा दुर्घटने प्रकरणी फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात एकच खळबळ माजली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात शनिवारी रात्री लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाला. नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागात आग लागली. त्यानंतर आता पंतप्रधान निधीतून पीडित पालकांना 2 लाख, तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून सोमवारी यासंबंधी माहिती दिली. घडल्या घटने प्रकरणी बालकांच्या पालकांनी आणि नातेवाईकांनी रूग्णालयावर आणि डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. या दुर्घटनेत मृत पावलेली बालकं एक ते तीन महिन्यांची आहेत.
दरम्यान, मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील या घटनेबाबत तिव्र दु:ख व्यक्त केलं आहे. शिवाय पीडित पालकांना 5 लाख रूपयांची मदत देखील जाहीर केली आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यानी घटनेची सखोल चौकशी करण्याचे देखील आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भंडाऱ्यातील रूग्णालयाची पहाणी केली. त्याचप्रमाणे पीडित पालकांना भेटून त्यांचं सांत्वन देखील केलं. पालकांचं सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणालाही आरोपी करणार नाही, मात्र दुर्लक्ष करणाऱ्यांना सोडणार नाही, असं सांगितलं.