लखनऊ: अवघ्या दहा हजार रुपयांच्या कर्जासाठी उत्तर प्रदेशच्या अलिगढ येथे एका अडीच वर्षांच्या चिमुकलीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील टप्पल नावाच्या गावात हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला. संबंधित मुलीच्या पालकांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दोघांना दहा हजार रुपये उधार दिले होते. हे पैसे परत देण्यासाठी तगादा लावल्यानंतर या दोघांनी संबंधित जोडप्याच्या अडीच वर्षांच्या मुलीला निर्घृणपणे ठार मारले. झाईद व अस्लम अशी या नराधमांची नावे आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३१ मे रोजी ही मुलगी घरातून गायब झाली होती. यानंतर २ जून रोजी घरानजीकच्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये या मुलीचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची अवस्था अत्यंत भयानक होती. या मुलीचे डोळे बाहेर काढण्यात आले होते. तिचा एक हातही कापण्यात आला होता. यानंतर तिला जाळण्यात आले होते. या अनन्वित अत्याचारांमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. या मुलीवर बलात्कार झालेला नाही. केवळ पूर्ववैमनस्यातील रागातूनच झाईद व अस्लमने या मुलीची इतक्या निर्घृणपणे हत्या केली.  



पोलिसांनी झाईद आणि अस्लमला अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. यावेळी करण्यात आलेल्या चौकशीत पैशांच्या देवाणघेवाणीवरून मुलीचे पालक आणि या दोघांमध्ये वाद असल्याचे समोर आले. या रागातूनच झाईद आणि अस्लम यांनी हे पाशवी कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.